काही दिवसांपूर्वी युवराजनेही धोनी आणि कोहली यांच्याबद्दल काही वक्तव्यं केली होती. यामध्ये युवराज असं म्हणाला होता की, ” मला एक खेळाडू म्हणून जेवढा पाठिंबा सौरव गांगुलीने दिला तेवढा धोनी आणि कोहली यांनी कधीच दिला नाही.” त्यानंतर आता योगराज सिंग यांनीही विराट आणि धोनी यांच्यावर तोफ डागली आहे. कारण धोनी आणि कोहली या दोघांनी युवराजला जास्त पाठिंबा दिला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
योगराज सिंग म्हणाले की, ” कोहली आणि धोनीबरोबर निवड समितीनेही युवराजचा विश्वासघात केला आहे. एकदा भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मला एका फोटोसाठी बोलावले होते. त्यावेळी मी त्यांना माझ्याजवळ बोलावले आणि सांगितले की, मी निवड समितीला सांगणार आहे की, धोनी, कोहली आणि रोहित शर्मा यांना निवृत्ती घेण्यासाठी एक सामना द्यावा. कारण या तिघांनी बऱ्याच खेळाडूंच्या पाठिमध्ये खंजीर खुपसला आहे. त्यामुळे त्यांना निवृत्तीचा एक सामना द्यावा, असे मी निवड समितीला सांगणार आहे.”
यापूर्वी योगराज यांनी धोनीवर निशाणा साधला होता. २०११च्या विश्वचषकाच्या निवडीसाठी धोनी हा युवराजपेक्षा सुरेश रैनाला जास्त प्राधान्य देत होता. पण त्याने युवराजला पाठिंबा दिला नव्हता. आता तर योगराज यांनी धोनीबरोबर कोहलीवरही टीका केली आहे. युवराजला ड्रॉप करण्यासाठी कोहली धोनीची मदत करत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
योगराज सिंग यांनी निवड समिती सदस्य शरणदीप सिंग यांच्यावरही टीका केली आहे. याबाबत योगराज म्हणाले की, ” जेव्हा शरणदीप सिंग निवड समितीच्या बैठकीला जायचे तेव्हा ते युवराजला खेळवायला नको, असेच म्हणायचे. ज्यांना क्रिकेटची एबीसीडी माहिती नाही, त्यांना निवड समिती सदस्य बनवण्यात आले आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times