सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे देश चिंतेत आहे. भारतात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात पोलिस दल आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. पण त्याच्या जीवाची काळजी मात्र योग्यपद्धतीने घेतली जात नाही असे दिसत आहे. कारण पोलिस दलातील बऱ्याच जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांचा जीवही धोक्यात आहे.
दिल्लीमध्ये पोलिस दलातील अमित कुमार यांचे निधन झाले. यावर गंभीरने दु:ख व्यक्त केले आहे, त्याचबरोबर केजरीवाल सरकारवर टीकाही केली आहे. पण पण टीका करून गंभीर थांबलेला नाही. त्याने यापुढे जाऊन एक जबाबदारीही घेतलेली आहे. त्यामुळे आता गंभीरचे देशभरात कौतुक होत आहे. त्याचबरोबर गंभीरचा आदर्श अन्य व्यक्तींनीही घ्यावा, असे म्हटले जात आहे.
अमित कुमार यांच्या मुलाची सर्व जबाबदारी आता गंभीरने घेतली आहे. याबाबत गंभीरने एक ट्विट केले आहे. गंभीर म्हणाला की, ” प्रशासन, यंत्रणा आणि दिल्ली करोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलेले आहे. पोलिस दलातील अमित कुमार यांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांना आपण परत आणू शकत नाही. पण त्यांच्या मुलाची जबाबदारी घेण्याचे मी ठरवले आहे. माझ्या मुलासारखीच मी त्याची काळजी घेईन. गौतम गंभीर फाऊंडेशन हे अमित यांच्या मुलाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलणार आहे.”
गंभीरने यापूर्वीही बरीच चांगली कामं केली आहेत. गंभीरने करोनाशी लढण्यासाठी सरकारला आपले दोन वर्षांचे वेतन दिले होते. यापूर्वी सीमेवर जे भारताचे जवान शहिद होतात, त्यांच्या मुलांची जबाबदारीही गंभीरने घेतली आहे. गौतम गंभीरचे फाऊंडेशन काही अनाथ मुलांचीही जबाबदारी घेत आहे. त्यामुळे गंभीरचा आदर्श अन्य क्रिकेटपटूंनी किंवा मोठ्या हस्तींनी घ्यावा, असे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times