बलबिर हे ९६ वर्षांचे असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यामुळे त्यांना चंदीगढ येथील सेक्टर ३६मधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर मुलगी सुशबिर आणि नातू कबिर आहेत. बलबिर यांनी भारताला मिळालेल्या तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.
बलबिर यांचा नातू कबिर यांनी सांगितले की, ” आजोबांना आज सकाळी ९ वाजता हार्टअॅटॅक आला होता. त्यानंतर त्यांना मेडिकल आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आजोबांची तब्येत काही दिवसांपासून सुधारत होती. पण आज मात्र त्यांना हार्टअॅटॅक आल्यामुळे प्रकृती चिंताजनक आहे.”
बलबिर यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना १०४ डिग्री ताप होता. त्यानंतर बलबिर यांची करोना चाचणी करण्यात आली होती. बलबिर यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. पण आज त्यांना हार्टअॅटॅक आल्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे.
बलबिर यांचे राजिंदर कालरा हे फॅमिली डॉक्टर आहेत. राजेंद्र हेसुद्धा भारताच्या विश्वविजयी संघातील एक सदस्य होते. बलबिर यांच्या प्रकृतीबाबत राजिंदर यांनी सांगितले की, ” बलबिर यांना गुरुवारी १०४ डिग्री एवढा ताप होता. त्यांच्यावर काही उपचार केले, पण त्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये जास्त सुधारणा दिसली नाही. त्यामुळे त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बलबिर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. पण कालपेक्षा त्यांची प्रकृती आज सुधारलेली पाहायला मिळत आहे. बलबिर यांची करोना व्हायरसची आज चाचणीही करण्यात आली आहे. या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times