ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत काही खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपली मते मांडली आहेत. यामध्ये बहुतांशी व्यक्तींनी विश्वचषक ऑक्टोबरमध्ये होणे कठीण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयसीसी आता विषयावर गंभीर झाली आहे. त्यामुळेच आयसीसीने ही बैठक बोलावल्याचे कळत आहे.
आयसीसीच्या बैकठीमध्ये ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये खेळवायची की नाही, यावर चर्चा होणार आहे. काही जणांच्या मते ही स्पर्धा सध्याच्या घडीला रद्द करावी आणि ती २०२२ साली खेळवण्यात यावी, असे समजत आहे. पण यावर आयसीसीच्या बैठकीमध्येच निर्णय होऊ शकतो. आयसीसीची ही बैठक २८ मे या दिवशी होणार आहे.
आयसीसीकडे विश्वचषकासाठी तीन पर्यायसध्याच्या घडीला आयसीसीकडे तीन पर्याय असल्याचे समजत आहे. या तिन्ही पर्यांयावर आयसीसी आपल्या बैठकीमध्ये विचार करणार आहे. या तीन पैकी एका पर्यायावर आयसीसीला ठाम राहावे लागणार आहे.
आयसीसीपुढे पहिला पर्याय आहे की, हा विश्वचषक नियोजित वेळत खेळवावा. त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता आयसीसीला करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व देशांच्या खेळाडूंना स्पर्धेपूर्वी १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करावे लागेल. त्यानंतर या सर्व खेळाडूंची आयसीसीला वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागेल.
आयसीसीपुढे दुसरा पर्याय असा आहे की, विश्वचषक स्पर्धा ही प्रेक्षकांविना खेळवावी. ही स्पर्धा कधी भरवावी, याबाबत आयसीसीकडून अजून स्पष्टता आलेली नाही. पण प्रेक्षकांविना जर स्पर्धा भरवली तर ते सुरक्षितेतसाठी चांगले असेल, असे म्हटले जात आहे. पण त्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला काय वाटते, हे आयसीसीला जाणून घ्यावे लागेल.
आयसीसीकडे तिसरा पर्याय असा आहे की, ही स्पर्धा २०२२ साली पुढे ढकलावी. सध्याच्या घडीला जगभरात चिंताग्रस्त वातावरण आहे. त्यामुळे जर नियोजित वेळेत ही स्पर्धा भरवली तर त्याला चाहत्यांचा प्रतिसाद कदाचित चांगला मिळणार नाही. त्यामुळे २०२२ साली ही स्पर्धा भरवावी, जेणेकरून प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहता येतील आणि वातावरणही सुरक्षित असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times