Wrestler Bajrang Punia: भारताचा कुस्तीपटू बजरंज पुनियाने (Bajrang Punia) कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावलं. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचं आव्हान होतं. हा सामना ९-२ असा जिंकून बजरंगने कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक (Commonwealth 2022 Gold Winner) जिंकलं. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदही पटकावलं होतं. पुनियाने केलेली ही कामगिरी जितकी कौतुकास्पद आहे, तितका त्याचा इथपर्यंत पोहचण्याचा प्रवासही खडतर होता. कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाला सुवर्ण मिळवून देणारा हिरयाणाचा बजरंग पुनिया (Haryana Wrestler) लहान असताना शिक्षणात तितकाच चांगला नव्हता. शाळेत न जाण्यासाठी, शाळा चुकवून तो लहानपणापासून कुस्तीच्या आखाड्यात उतरत होता. तिथे कुस्ती जिंकल्यानंतर मिळालेल्या बक्षिसांनी त्याला प्रोत्साहन मिळत गेलं आणि अनेक अडथळे पार करत आज तो भारताचा स्टार खेळाडू ठरलाय.

कुस्तीपटू बजरंग पुनिया

हरियाणाच्या संस्कृतीत कुस्ती आहे, इथल्या गावांतील प्रत्येक घरात लंगोट टांगलेलं मिळेल असं पुनियाने म्हटलं होतं. पुनिया मागील ८ वर्षांपासून भारताचा कुस्तीपटू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर, सततच्या अथक प्रयत्नांनी मोठं यश मिळवलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुनिया सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात होता. पण या सामन्याच्या केवळ एक महिना आधी तो जखमी झाला. त्यामुळे सामन्यात हवी तशी कामगिरी न झाल्याने सेमीफायनलमध्ये तो हरला, पण त्याने कांस्यपदक पटकावलं.

शाळेत न जाता कुस्तीच्या आखाड्यात खेळायचा

हरियाणात राहणारा बजरंग पुनिया वयाच्या जवळपास आठव्या वर्षापासूनच कुस्तीच्या तालमीत जात होता. शाळेत जायचं नसल्याने तो शाळेत न जाता कुस्तीच्या आखाड्यात खेळायचा. त्याचे वडील बलवंत पुनिया हेदेखील कुस्तीपटू होते. मातीच्या आखड्यात तो कुस्ती खेळायचा, पण त्यानंतर त्याने वयाच्या १२व्या वर्षापासून मॅटवर खेळली जाणारी कुस्ती शिकण्यास सुरुवात केली. दिल्लीत त्याने ही कुस्ती खेळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तो पुढे कधीही थांबला नाही.

पदकांची मोठी कामगिरी

२०१३ मध्ये पुनिया आशियाई स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत पोहोचला (Wrestler Bajrang Punia) होता. २०१४ मध्ये त्याने आशियाई स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. २०१७ आणि २०१९ मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत त्याने गोल्ड मेडल पटकावलं होतं. २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई स्पर्धेत त्याने गोल्ड मेडल जिंकलं होतं. २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, त्यानंतर आता पुन्हा त्याने कॉमनवेल्थ २०२२ मध्ये सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.

सुवर्णपदकाची कामगिरी

कुस्तीपटू बजरंग पुनियाकडे केवळ हरियाणाचं नाही, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ६५ किलो वजनी फ्रीस्टाइल गटात त्याने कॅनडाच्या लचलान मॅकनीलला ९-२ अशा मोठ्या फरकाने मात दिली. त्यानंतर काही मिनिटांत त्याने सुवर्णपदक पटकावलं. याआधी सेमीफायनलमध्ये त्याने इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला १०-० ने हरवलं होतं. पुनियाचे वडील बलवंत पुनिया यांनीही आपला मुलगा या स्पर्धेत सुवर्णपदकच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता.

हरियाणवी कुस्तीपटू

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत हरियाणाच्या कुस्तीपटूंनी जबरदस्त कामगिरी केली. कुस्तीमध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनियाने सुवर्णपदक पटकावलं. तर, पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये सुधीर लाठनेही सुवर्णपदकाची कामगिरी केली. तसंच अंशु मलिकने रौप्य पदकाची कामगिरी केली, तर मोहित ग्रेवालने कांस्य पदक पटकावलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हरियाणाचे ४३ खेळाडू विविध खेळांमध्ये सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ७ सुवर्णपदकांसह २१ पदकं हरियाणातील खेळाडूंनी जिंकले आहेत. २०१८ मध्ये कॉमननवेल्थमध्ये हरियाणातील खेळाडूंनी २२ पदकं जिंकली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here