देशभरात करोनामुळे लॉकडाउन जाहीर केल्यामुळे ज्योती कुमारीला आपल्या वडिलांना बिहार येथे नेणे शक्य होत नव्हते. शेवटी तिने आपल्या वडिलांना सायकलच्या मागे असलेल्या ‘कॅरिअर’वर बसवून गुरुग्राम ते बिहार हे १२०० किमीचे अंतर कापण्याचे ठरविले. तिने हे अंतर ७ दिवसांत कापले. भारताच्या सायकलिंग फेडरेशननेही ज्योतीचे कौतुक करत तिला ट्रायल देण्यासाठी बोलावले आहे.
इवांका यांनीही ज्योतीची दखल घेतली आहे. इवांका यांनी फक्त ज्योतीची दखल घेतली नाही तर तिचा हा पराक्रम जगालाही सांगितला आहे. इवांका यांनी ज्योतीच्या साहसाबद्दल एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये इवांका यांनी लिहिले आहे की, ” ज्योतीले आपल्या वडिलांना घेऊन लॉकडाऊनमध्ये तब्बल १२०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. भारतीयांच्या प्रेमाचे आणि सहनशक्तीचे एक प्रतीक पाहायला मिळाले आहे. भारतीयांच्या कल्पनाशक्तीचे हे एक प्रातिनिधीक चित्र आहे.”
ज्योतीची ही हिंमत पाहून तिच्यातील गुणवत्तेला न्याय देता येईल का, असा विचार सायकलिंग फेडरेशनने केला आहे. सायकलिंग फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओंकार सिंग म्हणाले की, जर ज्योती कुमारी चाचणीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली तर दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत तिची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली जाईल.
ज्योती कुमारीला चाचणीला बोलावण्यामागील हेतूबद्दल सांगताना ओंकार सिंग म्हणाले की, तिच्यात काहीतरी गुणवत्ता नक्कीच आहे. तब्बल १२०० किमी प्रवास सायकलने करणे ही खचितच सोपी गोष्ट नाही. तिच्याकडे तेवढी ताकद आणि क्षमता निश्चितच आहे. त्याची चाचणी आम्हाला करून पाहावी लागेल. त्यासाठी आम्ही दिल्ली स्थित अकादमीत असलेल्या संगणकीकृत सायकलवर बसवून तिची चाचणी घेतली जाईल. तिची निवड होण्यासाठी तिला सात ते आठ निकषांची पूर्तता करावी लागेल. एकदा का ती त्यात उत्तीर्ण झाली की मग ती प्रशिक्षणार्थी असेल. तिला कोणताही खर्च करावा लागणार नाही. आम्ही नेहमीच गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times