मुंबई: शेकडो शरीरसौष्ठवपटूंना घडविणाऱ्या मातृछाया व्यायामशाळेचे सर्वेसर्वा, मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाचे खरेखुरे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आणि शरीरसौष्ठवाचे भाई असलेले सत्यवान उर्फ भाई कदम यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, ३ मुली, सून आणि नातवंडं असा परिवार आहे.

मुंबईतील शरीरसौष्ठवाला भारतातील सर्वात शक्तिशाली संघटना बनविण्याचे कौशल्य दाखविण्याची किमया भाई यांच्याच अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने करून दाखविली. भाईंनी शरीरसौष्ठवाची चळवळ उभारल्यामुळे आणि तरूणाईला फिटनेसचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिल्यामुळेच मुंबईत मोठ्या संख्येने व्यायामशाळांची निर्मिती होऊ लागली. त्यांच्या या कार्यामुळे शरीरसौष्ठवात त्यांचा दराराच नव्हता तर त्यांचे शब्दही अंतिम मानले जायचे. आपले अवघे आयुष्य शरीरसौष्ठव खेळाच्या प्रचार, प्रसार आणि प्रगतीसाठी समर्पित करणारे भाई स्वत: एक पीळदार देहयष्टीचे शरीरसौष्ठवपटू होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नाव उंचावले. तसेच त्यांनी ६०च्या दशकांत भारत श्री हा बहुमानही संपादन केला होता.

मुंबई शरीरसौष्ठवाची सुत्रे एकहाती सांभाळणाऱ्या भाईंनी १९७१ साली दादर कबुतरखान्याशेजारी मातृछाया व्यायामशाळा सुरू केली. ही नुसती व्यायामशाळा नव्हती तर राष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठवपटूंच्या निर्मितीचा कारखाना होता. या कारखान्यातून मधुकर थोरात, शाम रहाटे, विकी गोरक्ष, मोहनसिंग गुरखा, विनय दलाल, भाऊ गुजर, वॉल्टर फर्नांडिस, प्रकाश गव्हाणे, प्रविण गणवीरसारखे हीरे शरीरसौष्ठव खेळाला सापडले. भाईंकडे शरीरसौष्ठवाचे अफाट ज्ञान आणि माहिती असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शेकडो खेळाडू त्यांच्याकडे यायचे. तसेच अनेक ठिकाणी ते स्वत: मार्गदर्शन शिबीरे घ्यायचे. शरीरसौष्ठवात असंख्य खेळाडू घडविल्याबद्दल राज्यशासनाने १९९१ साली दादोजी कोंडदेव राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले होते. मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष असलेल्या भाईंच्या नेतृत्वाखालीच अनेक जागतीक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्पर्धांचे आयोजन मुंबईत केले गेले.

शरीरसौष्ठवाची अपरिमित हानी – चेतन पाठारेभाई यांच्या निधनाचे वृत्त कळताच शरीरसौष्ठवावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने मुंबई शरीरसौष्ठवाची अपरिमित हानी झाल्याची भावना भारतीय शरीरसौष्ठवाचे सरचिटणीसी चेतन पाठारे यांनी व्यक्त केली. भाई हे अखंड शरीरसौष्ठवाचे मार्गदर्शक होते, राजदूत होते. त्यांच्या मृत्यूमुळे शरीरसौष्ठवात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली. मुंबई शरीरसौष्ठवाचे पितृछत्र हरपल्याची श्रद्धांजली सरचिटणीस राजेश सावंत यांनी वाहिली. महाराष्ट्राने शरीरसौष्ठव क्षेत्रातील उत्कृष्ट मार्गदर्शक गमावल्याची श्रध्दांजली ॲड. विक्रम रोठे यांनी वाहिली. भाईंवर दुपारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे मोजकेच नातेवाईक होते. मात्र याप्रसंगी त्यांचे शिष्य असलेल्या शाम रहाटे आणि मधुकर थोरात यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

अंध मुलांसाठी सुरू केला ऑर्केस्ट्राशरीरसौष्ठव हे भाईंचे पहिले प्रेम असले तरी गायन हे त्यांचे दुसरे प्रेम होते. ते स्वत: चांगले गायक होतेच, त्यांना संगीतांची चांगली जाण होती. त्यांनी अंध मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक ऑर्केस्ट्राही सुरू केला. या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून राज्यभर अनेक प्रयोगही केले. मात्र 13 वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघात झाल्यामुळे त्यांच्या या गोष्टी तिथेच थांबल्या. तसेच त्यांचा संघटक म्हणून स्पर्धेतील प्रत्यक्ष सहभागही कमी झाला.

भाईंचा मृत्यू दिन आणि दादांचा जन्म दिनमुंबई शरीरसौष्ठवातील भाई आणि दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यवान कदम आणि हेमचंद्र पाटील यांचा एक दुर्देवी योगायोग जुळून आला. आज हेमचंद्र पाटील यांचा जन्मदिन आहे तर त्याच दिवशी शरीरसौष्ठवाचे भाई सत्यवान कदम जगाचा निरोप घेऊन गेले. नियतीचाही खेळ न्यारा ठरला. यापुढे दादांचा जन्मदिन आता भाईंचा स्मृतीदिनही असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here