ज्या देशाने आपल्यावर राज्य केलं त्यांच्याच देशात जाऊन आपाल झेंडा फडकावण्याचे काम एका महान खेळाडूने केले होते. इंग्लंडला त्यांच्याच मातीत धूळ चारल्यावर पुरस्कार स्वीकारताना भारताचे राष्ट्रगीत सुरु झाले आणि इंग्लंडमध्ये तिरंगा फडकला होता.

ही गोष्ट आहे एका योद्धाची. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्याने आपला अमीट असा ठसा सोडला होता. पण ज्या इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं त्यांच्याच देशात जाऊन तिथे सर्वांसमोर तिरंगा फडकावण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. ज्या देशाने आपल्यावर राज्य केले, त्या देशातील लोकं आपला तिरंगा उंचावर जाताना पाहत होती. त्यावेळी डोळे भरून आले होते, असे या महान खेळाडूने सांगितेल होते.

ही गोष्ट आहे १९४८ सालची. जेव्हा भारतीय संघ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. भारताच्या हॉकी संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्यापुढे आव्हान होते ते यजमानांचे. पण यावेळी भारताने त्यांच्यावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला होता. भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो नुकत्याच निधन पावलेल्या बलबिर सिंग सिनिअर यांनी. कारण या सामन्यात तब्बल दोन गोल करत त्यांनी भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली होती. भारताकडून बलबिर यांनी दोन तर तरचोलन सिंग आणि पॅट जेनसेन यांनी प्रत्येकी एक गोल केला होता.

या विजयाची आठवण सांगताना एकदा बलबिर भावूक झाले होते. बलबिर म्हणाले होते की, ” ज्या देशाने आपल्यावर राज्य केले त्या इंग्लंडमध्ये तिरंगा फडकावण्याचा आनंद काही औरच होता. या आनंदाला सीमा नाही आणि तो शब्दांत व्यक्तही करता येऊ शकत नाही. जेव्हा आम्ही फायनल जिंकलो आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो तेव्हा भारताचे राष्ट्रगीत वाजायला सुरुवात झाली. त्यावेळी तिरंगाही डौलाने हळूहळू वर सरकत होता. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असाच होता. मला वाटत होते की, त्या वर जाणाऱ्या तिरंग्यासारखे मीदेखील वर जात आहे. तो अनुभव शब्दांत मांडणे नक्कीच कठिण आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here