धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला पराभूत केले होते. त्यावेळी श्रीलंकेचे कर्णधारपद हे कुमार संगकाराकडे होते. आता संगकारानेच धोनीने दुसऱ्यांदा टॉस करायला का लावला, याबाबतचे सत्य सांगितले आहे. हे सत्य आहे तरी काय, जाणून घेऊया…
नेमके घडले तरी काय…
विश्वचषकाची अंतिम फेरी पाहण्यासाठी वानखेडेवर प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होते. वानखेडे स्टेडियम पूर्णपणे भरलेले होते. त्यामुळे सामना होण्यापूर्वीच लोकांनी काही घोषणा द्यायला सुरुवात केली होती. सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी धोनी आणि संगकारा हे टॉस करण्यासाठी मैदानात आले होते. यावेळी दुसऱ्यांदा टॉस का केला याबाबत संगकाराने सांगितले की, ” मी, धोनी आणि सामनाधिकारी टॉससाठी उभे होतो. सामनाधिकारी यांनी टॉस उडवला. त्यावेळी मैदानात भरपूर आवाज येत होता. त्यामुळे आम्हाला काहीही ऐकायला येत नव्हते. त्यावेळी तू टेल म्हणालास का, असं धोनीने मला विचारलं. मी त्याला म्हणालो नाही, मी हेड बोललो होतो. मी नाणेफेक जिंकली असं सामनाधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण त्यावेळी मी काय बोललो हे धोनीला ऐकायला गेले नव्हते. त्यामुळे धोनी म्हणाला की संगकाराने नाणेफेक जिंकलेली नाही, आपण दुसऱ्यांदा नाणेफेक करायला हवी. त्यानंतर धोनीच्या सांगण्यावरून दुसऱ्यांदा नाणेफेक करण्यात आली. त्यावेळी मी हेड म्हटले होते आणि मी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.”
काही दिवसांपूर्वी भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने एका व्हिडीओच्या माध्यमातून संगकाराला प्रश्न विचारला होता. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोनदा नाणेफेक का करण्यात आली असे अश्विनने संगकाराला विचारले होते. अश्विनच्या या प्रश्नाचे उत्तर आज संगकाराने दिले आहे
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times