मार्चच्या पहिल्या आठवड्यात महिला आयपीएल

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ‘मार्चच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या लीगला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्ड कप ९ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. त्यानंतर लगेचच ही लीग घेण्याचा प्रस्ताव आहे. पुरुषांच्या आयपीएलआधी ही स्पर्धा संपविण्याचा विचार आहे. सध्या तरी आम्ही पाच संघांमध्ये ही लीग घेण्याचा विचार करीत आहोत. मात्र, गुंतवणुकदारांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही संख्या सहा होऊ शकते. यादरम्यान संघांच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल.’ हेही वाचा – आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कपसाठी BCCI सर्वात मोठी निवड करणार का? सोशल मीडियावरील एका ट्विटने खळबळ उडाली
२०२३ मध्ये होणार Women’s IPL

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांनी यापूर्वी महिलांची आयपीएल पुढील वर्षी होणार असल्याचं निश्चित केलं आहे. बऱ्याच क्रिकेटप्रेमींचा असा विश्वास आहे, की महिलांची आयपीएल क्रांती घडवून आणेल आणि यामुळे भारतातील महिला क्रिकेटचा दर्जाही उंचावेल. ‘भागधारकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या संघांबाबत विचारणा सुरू झाल्या आहेत. अनेक जण संघ घेण्यासाठी उत्सुक आहेत,’ असं जय शहा यांनी वृत्तसंस्थेला मागे दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
संघ खरेदी करण्यासाठी पुढाकार

महिला लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी मुंबई, राजस्थान, चेन्नई या पुरुष संघांच्या मालकांनी रूची दाखवली आहे. याआधी २०१८ पासून बीसीसीआय (BCCI) तीन संघांची आयपीएल घेत आहे. या लीगला महिलांची टी-२० चॅलेंज (T20 Challenge) असं नाव दिलं होतं. या चार सामन्यांची लीग पुरुषांच्या आयपीएलदरम्यान होत होती. या लीगमध्ये भारताबाहेरील अव्वल महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. आता महिला पुढील वर्षी मार्च महिन्यापासून महिला आयपीएल सुरू होईल.
वर्षाच्या अखेरपर्यंत संघांचा लिलाव अपेक्षित

महिलांच्या आयपीएलचा (Women’s IPL) पहिला सीजन मार्च २०२३ मध्ये खेळला जाणार आहे. या लीगमध्ये पंधरा दिवसांत १९ सामने खेळवण्याचा विचार आहे. महिलांच्या आयपीएलचा फॉरमॅट पुरुषांच्या आयपीएलसारखाच असेल. अव्वल संघ प्ले-ऑफमध्ये खेळतील. घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सामने खेळण्याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. वेगवेगळ्या मैदानांवर स्पर्धा घेण्यापेक्षा केवळ महाराष्ट्रात स्पर्धा घेण्याचाही विचार सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत संघांचा लिलाव होणं अपेक्षित आहे. हेही वाचा – मुंबईला क्रिकेटचे वेड लावणाऱ्या सचिनच्या मुलाला का सोडावं लागलं शहर; निर्णय ठरणार गेमचेंजर?
‘पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच महिला आयपीएल यशस्वी होईल’

पुरुषांच्या आयपीएलमधील अनेक संघ मालकांनी महिला लीगमध्ये संघ घेण्यास उत्सुकता दाखवली आहे. या लीगच्या माध्यम हक्काबाबत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात येणार आहे. या लीगचा अंतिम निर्णय या सभेनंतरच घेण्यात येणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी, महिला आयपीएल घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. ही आयपीएल २०२३ मध्ये नक्कीच होणार असून पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच ती यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times