राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. त्याचबरोबर भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारताची महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्माचीही बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

भारताच्या क्रीडा मंत्रालयाने २०२० या वर्षांतल विविध पुरस्कारांसाठी क्रीडा संघटनेला शिफारस करायला सांगितली होती. त्यानुसार या चार क्रिकेटपटूंची शिफारस बीसीसीआयने केली आहे.

याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की, ” सध्याच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आपला एक अमीट ठसा उमटवला आहे. त्याच्यासारखी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. आमच्याकडे काही पर्याय उपलब्ध होते. पण खेलरत्न पुरस्कारासाठी आम्ही रोहित शर्माचे नाव सुचवले आहे. इशांत शर्मा हा बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेटची सेवा करत आहे. सध्याच्या घडीला तो भारतीय संघातील वरीष्ठ वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर सलामीवीर शिखर धवनने सातत्यापूर्ण कामगिरी केली आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये दिप्ती शर्माने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच या तिन्ही क्रिकेटपटूंची आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.”

रोहित शर्माच्या नावावर बरेच विक्रम आहे. आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तब्बल तीन वेळा द्विशतके झळकावण्याचा मान रोहितच्या नावावरच आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात सर्वाधिक धावा या रोहितच्याच नावावर होत्या. रोहितने गेल्या विश्वचषकाच्या सामन्यात धावांची टांकसाळच उघडली होती. वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये रोहितने आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. एक कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधित जेतेपदे रोहितच्याच नावावर आहेत.

सलामीवीर धवनने आतापर्यत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रोहितबरोबर त्याने बऱ्याचदा भारताला दणदणीत सुरुवात करून दिली आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघात सर्वाधिक सामना खेळणारा वेगवान गोलंदाज हा इशांत शर्मा आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर जेेव्हा गेला होता तेव्हा इशांत हा चांगल्या फॉर्मात होता. गेली काही वर्षे तो सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here