भारताचा एक माजी वेगवान गोलंदाजाने हा खुलासा केलेला आहे. क्रिकेट खेळत असताना माझ्यावरही वर्णद्वेषाबाबत टिप्पणी केली होती, पण या गोष्टीमुळे हताश झालो नाही, असेही या क्रिकेटपटूने सांगितले आहे. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या एका खेळाडूनेही वर्णद्वेषाबाबत आपल्याला डिवचल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
श्रीलंकेच्या दौऱ्याच्यावेळी काय घडले होते…भारतीय संघत २०१७ साली श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताचा क्रिकेटपटू अभिनव मुकुंदला त्याच्या त्वचेच्या रंगावरून हिणवण्यात आले होते. या क्रिकेटपटूने त्यानंतर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्याने म्हटले होते की, ” बऱ्याच दिवसांपासून मला माझ्या त्वचेच्या रंगावरून हिणवण्यात येत आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, फक्त गोरा रंग असणारे व्यक्ती हँडसम दिसत नाहीत. मला लहानपणापासून वर्णद्वेषाबाबत हिणवण्यात आले आहे, त्यामुळे मला आता ही गोष्ट नवीन वाटत नाही. जो क्रिकेटला समजू शकतो, त्याला ही गोष्ट नव्याने सांगायची गरज नाही. कारण तुम्ही उन्हामध्ये क्रिकेट खेळत असता, तेव्हा तुमच्या त्वचेचा रंग बदलत असतो. त्याचबरोब तुमची त्वचा काळी पडू लागते. देशामध्ये सर्वात जास्त उष्णता असलेल्या चेन्नईमध्ये मी राहतो, त्यामुळे उन्हामध्ये खेळून माझ्या त्वचेचा रंग बदलणे स्वाभाविक आहे.”
मुकुंदच्या पत्राची आठवण झाल्यावर या भारतीय माजी गोलंदाजाने सांगितले की,” मी क्रिकेट खेळत असताना मलादेखील वर्णद्वेषाबाबत बरेच ऐकावे लागले होते. ही गोष्ट एका दिग्गज क्रिकेटपटूलाही माहिती होती. पण या गोष्टीमुळए मी निराश झालो नाही, तर त्वेषाने पेटून उठलो. मी जर निराश झालो असतो तर भारत आणि कर्नाटकसाठी मिळून शंभरपेक्षा जास्त सामने मी खेळू शकलो नसतो.”
हा माजी गोलंदाज कोण…वर्णद्वेषाबाबत टीका झेलणारा हा माजी गोलंदाज कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा माजी गोलंदाज आहे डोड्डा गणेश. भारताकडून १९९७ साली गणेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतासाठी चार कसोटी आणि एक वनडे सामना तो खेळला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times