सध्याच्या घडीला करोनामुळे क्रिकेट मंडळांची वाईट अवस्था आहे. जोपर्यंत क्रिकेट सुरु होत नाही, तोपर्यंत कोणत्याही क्रिकेट मंडळाकडे पैसे येणार नाही. पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ तर तोट्यामध्येच असल्याचे म्हटले जाते. कारण पाकिस्तानमध्ये कोणतेच सामने होताना दिसत नाही. त्यामुळे करोननंतर जर पाकिस्तानला मदतीचा हात द्यायचा असेल तर त्यांच्या देशात क्रिकेट स्पर्धा होऊ शकते आणि भारताला या स्पर्धेत खेळायला जाणे भाग पडू शकते.
आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानला देण्यात आले आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील देश सहभागी होणार आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या स्पर्धेला भारत वगळता अन्य कोणत्याही देशाने विरोध केलेला दिसत नाही. ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असेल तर भारत त्यामध्ये सहभागी होणार नाही, असे म्हटले जात होते. पण आयसीसीच्या नियमांनुसार सर्व देशांना या स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल.
आज याबाबत एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये भारताने आपली बाजू मांडल्याचे समजते. भारताकडून या बैठकीसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हे उपस्थित होते.
यावेळी भारताने सांगितले की, ” करोनाचे संकट सर्वत्र आहे, त्यामुळे ही स्पर्धा खेळवायची की नाही याबाबत निर्णय व्हायला हवा. जर स्पर्धा खेळवायची असेल तर त्यासाठी सुरक्षित ठिकाण आपल्याला पाहावे लागेल. कारण शेवटी खेळाडूंचाही प्रश्न आहे. त्यामुळे योग्य तो विचार करून स्पर्धेबाबत निर्णय घ्यावा लागेल.”
आज या बैठकीत बरीच चर्चा झाली, पण अंतिम निर्णय मात्र होऊ शकला नाही. उद्या आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times