करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना अजूनही सराव करण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू सध्या घरीच आहेत. जर सुरक्षेचा उपाय म्हणून बीसीसीआय खेळाडूंना सरावासाठी मैदानात पाठवत नसेल तर या परिस्थित परदेश दौरे कसे करता येतील, असा विचार बीसीसीआयने केला असावा.
भारतीय संघ श्रीलंकेमध्ये जाऊन तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळात चर्चा झाली होती. या दोन्ही मालिका जून-जुलै महिन्यांत खेळवण्यात येणार होत्या. सरकारच्या परवानगीनंतर या दोन्ही मालिका कधी खेळवायच्या, हे ठरवण्यात येणार होते. पण बीसीसीआयने हा दौराच रद्द करण्याचे काल ठरवले होते.
शुक्रवारी पुन्हा एकदा बीसीसीआयने झिम्बाव्बेचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर ऑगस्ट महिन्यात जाणार होता. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होता. पण हा दौरा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, ” करोना व्हायरसमुळे भारतीय संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. भारतीय संघ २४ जूनपासून श्रीलंकेमध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन वनडे सामने खेळणार होता. त्यानंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वेमध्ये जाऊन तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार होता. पण करोना व्हायरसमुळे हे दौरे नियोजित वेळेनुसार होऊ शकणार नाहीत.”
जर श्रीलंकेचा दौरा रद्द केला जात असेल तर तिथे आयपीएल खेळवायचे की नाही, याचा विचारही बीसीसीआयला करावा लागणार आहे. दुसरीकडे दौरा रद्द केल्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ मागू शकते. दौरा रद्द होत असेल तर आयपीएल आमच्याकडेच खेळवा, अशी अटही श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ बीसीसीआयपुढे ठेवू शकते. त्यामुळे हा दौरा रद्द करण्याचे काही परीणाम बीसीसीआयला भोगावे लागणार का, हे पाहावे लागेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times