सध्याच्या घडीला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आफ्रिदीला करोनाची लागण झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आफ्रिदीला झालेला करोना ही त्याच्या वाईट कर्माची फळं आहेत, असं काही चाहते आता म्हणायला लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील लोकांना मदत करताना आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली होती. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अपशब्द वापरले होते. मोदी हे करोनापेक्षा भयंकर आजार आहेत, असे आफ्रिदीने एका भाषणामध्ये म्हटले होते. त्याचबरोबर काश्मीरमधील लोकांवर मोदी हे अन्याय करत आहेत, असेही बेताल वक्तव्य त्याने केले होते. त्यामुळे चाहत्यांनी आफ्रिदीला चांगलेच ट्रोल केले होते.

आतापर्यंत आफ्रिदी पाकिस्तानमधील लोकांना मदत करत होता. त्यावेळी काही भारतीय लोकांनीही त्याची स्तुती केली होती. यामध्ये युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांचाही समावेश होता. पण जेव्हा आफ्रिदीने भारताविरुद्ध आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध गरळ ओकायला सुरुवात केली, त्यावेळी आफ्रिदी टीकेचा धनी ठरत होता. त्यामुळे आता करोना झाल्यावरही लोकं त्याला माफ करताना पाहायला मिळत नाहीत.

सध्याच्या घडीला आफ्रिदी हा चर्चेचा विषय आहे. एका युट्यूबवर या विषयी चर्चा सुरु होती. त्यावेळी आफ्रिदीला झालेला करोना ही त्याच्या वाईट कर्माची फळं आहे, असं या चर्चेत बोलले जात होते. त्यांच्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाला. चोप्रा म्हणाला की, ” शाहिदबाबत अशा गोष्टी बोलणे हे अमानवीय आणि असंदेशनशील आहे. शाहिद, तू लवकर बरा हो. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठिशी आहेत.”

“गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली आहे. करोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे,” असे ट्विट आफ्रिदीने केले आहे. आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील करोनाग्रस्त लोकांना तसेच अन्य नागरिकांना मदत करत आहे. त्याने सोशल मीडियावरून मदत कार्यचे फोटो शेअर केले होते. पण ही मदत करत असताना त्याने अनेक वेळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीर संदर्भात बेताल वक्तव्य केले होते. काही दिवसांपूर्वी आफ्रिदी काही लोकांना मदत करत होता. त्यावेळी तो बऱ्याच जणांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे आता त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही करोनाचा धोका असल्याचे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here