भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर मात करत विश्वचषक उंचावला होता. पण या अंतिम फेरीत मॅच फिक्सिंग करण्यात आली होती, असा धक्कादायक आरोप आता श्रीलंकेच्या माजी क्रीडा मंत्र्यांनीच केला आहे.

भारताने १९८३ सालानंतर २०११मध्ये विश्वचषक जिंकला होता. २०११ साली झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्डेडियमवर झाला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. पण हा अंतिम सामना फिक्स करण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा आता समोर येत आहे.

भारताने जेव्हा २०११ साली विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे होते. महिंदनंदा यांनीच भारताने विश्वचषक जिंकला तेव्हाचा अंतिम सामना फिक्स करण्यात आलेला होता, असे सांगितले आहे. ‘न्यूज फर्स्ट’ला मुलाखत देताना महिंदनंदा यांनी सांगितले की, ” विश्वचषकातील अंतिम सामना हा फिक्स करण्यात आला होता, हे यापूर्वीही मी सांगितले आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि जर कोणाला याबाबत वाद विवाद करायचा असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे. मी यामध्ये खेळाडूंना सहभागी करणार नाही, पण काही समूहांनी मिळून हा सामना फिक्स केला होता.”

या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करत असताना श्रीलंकेने महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर २७४ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी २७५ धावांची गरज होती. भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण भारताने माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना लवकर गमावले होते. त्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते. पण त्यानंतर गौतम गंभीर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने हा विश्वचषक गाजवला होता. या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करत युवराज हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. अंतिम फेरीतील गौतम गंभीरची खेळी आणि त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार अजूनही कोणी विसरू शकलेला नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here