करोना व्हायरसनंतर क्रिकेट नेमके कसे असेल, हे सांगता येत नाही. पण करोनानंतर क्रिकेटमध्ये नक्कीच काही बदल आपल्याला पाहायला मिळतील. दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर एक क्रिकेट स्पर्धा जून महिन्यातच खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत तीन संघ असतील, त्याचबरोबर हे सामने १२ षटकांचे असतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी संघात ११ नाही तर ८ खेळाडूंचाच समावेश असेल. या स्पर्धेचे नियम वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आले आहेत. काय आहेत या स्पर्धेतील नियम जाणून घ्या…

करोनानंतर क्रिकेटमध्ये आता बरेच बदल पाहायला मिळणार आहे. कारण खेळताना बरेच सुरक्षेचे उपायही घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता क्रिकेट अनोख्या ढंगात चाहत्यांसमोर येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता क्रिकेटमध्ये काही बदल केले जाणार आहेत.

या स्पर्धेत आजी-माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ए बी डिव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड मिलरसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा अनोखा प्रयोग दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ करणार आहे.

काय असतील स्पर्धेचे नियम…या स्पर्धेत तीन संघ खेळवले जातील. स्पर्धेत एकूण ३६ षटकांचा सामना होईल आणि प्रत्येक संघाला १२ षटके फलंदाजी करायला मिळेल. एक संघ अन्य दोन संघांबरोबर सहा-सहा षटकांचे दोन डाव खेळणार आहे. या १२ षटकांमध्ये ज्या संघाच्या सर्वाधिक धावा होतील, तो संघ विजयी ठरणार आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील संघात आठ खेळाडू असतील, त्यामुळे जर सातवा फलंदाज बाद झाला तर आठवा फलंदाज एकटा मैदानात असेल. पण या आठव्या फलंदाजाला एकेरी धाव घेता येणार नाही. या स्पर्धेतील विजेत्या संघाला सुवर्णपदक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघाला अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळणार आहे. ही स्पर्धा २७ जूनला रंगणार आहे. या स्पर्धेत किंगफिशर, काईट्स आणि इगल्स हे तीन संघ असतील. यावेळी रडाबा किंगफिशर संघाचे नेतृत्व करणार आहे. डी कॉककडे काईट्स संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर डिव्हिलियर्स हा इगल्स या संघाची कमान सांभाळणार आहे. या अनोख्या नियमांमुळे ही स्पर्धा कशी रंगेल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here