सध्याच्या घडीला भारतामध्ये चीनच्या कंपन्यांवर बंदी आणावी, असे म्हटले जात आहे. बीसीसीआयला सध्या प्रायोजकत्व दिलेली ‘विवो’ ही कंपनी चीनची आहे. त्यामुळे आता बीसीसीआय या कंपनीचे प्रायोजकत्व रद्द करणार का, असा सवाल उठत आहे. पण यावर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीयांमध्ये चीनबाबत त्वेषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आता चीनला ताळ्यावर आणायचे असेल तर एक गोष्ट भारत सरकारने करायला हवी, असे मत एका भारताच्या महान खेळाडूने व्यक्त केले होते. त्यानंतर बीसीसीआय आता चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व रद्द करणार की नाही, याबाबत चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.

‘विवो’ ही चीनची मोबाईल बनवणारी कंपनी आहे आणि बीसीसीआयच्या आयपीएलचे प्रायोजकत्व त्यांच्याकडे आहे. दर वर्षाला ही कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी प्रायोजकत्वासाठी देते. हा करार पाच वर्षांचा आहे आणि हा करार २०२२ साली संपणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला हा करार मोडायचा का, हा प्रश्न बीसीसीआयपुढे आहे.

याबाबत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष धुमल यांनी सांगितले की, ” जेव्हा आपण भावूक झालेले असतो, तेव्हा आपण योग्यच निर्णय घेतो असे नाही. आपण एक गोष्ट पाहायला हवी की, चीनची कंपनी जेव्हा आपली वस्तू भारतात विकायला येते तेव्हा त्यांचा एक उद्देश असतो. पण जेव्हा तुम्ही चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व घेतलेले असते तेव्हा त्यामध्ये भारताचा उद्देश सफल होत असतो.”

धुमल पुढे म्हणाले की, ” जेव्हा एखादी चीनची कंपनी भारतामध्ये येऊन वस्तू विकत असते तेव्हा ती येथील नागरिकांकडून पैसे घेते. त्यामधील काही पैसे ते बीसीसीआयला प्रायोजकत्व मिळवण्यासाठी देत आहेत. आम्ही या मिळकतीमधून ४२ टक्के कर हा भारत सरकारला देतो. त्यामुळे या गोष्टीमुळे चीनचा नाही तर भारताचा उद्देश सफल होत असल्याचे दिसत आहे. कारण या सर्व गोष्टीमधून भारताला फायदा होत आहे. कारण जर विवो या कंपनीने आयपीएलला प्रायोजकत्व दिले नाही तर ते आपला पैसा घेऊन चीनमध्ये जातील. त्यामुळे तो पैसा जर भारतामध्येच राहत असेल तर त्यासाठी आपण आनंदीत व्हायला हवे. कारण त्यांच्या पैशांमधूनच भारत सरकारला आम्ही कर देत आहोत.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here