सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या सर्व प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे. पण सुशांतला क्रिकेटचे वेड होते. त्यामुळे तो क्रिकेटपटूंच्या सानिध्यात असायचा, असाच एक युवा क्रिकेटपटू सुशांतला भेटला होता. त्यावेळी तो मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळत नव्हता आणि त्याला चांगली ओळखही मिळाली नव्हती. पण आता तो मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याने सुशांतला दिलेले ते वचन मात्र आता पूर्ण होऊ शकणार नाही.
सुशांतने ‘काय पो छे’ हा सिनेमा केला होता. या सिनेमातील कामामुळे सुशांतचे कौतुकही झाले होते. या सिनेमामध्ये एका युवा क्रिकेटपटूबरोबर सुशांत शूटींग करत होता. हे शूटींग सहा महिने चालले होते. या शुटींगनंतर सुशांतने या युवा क्रिकेटपटूला आपल्या घरी नेले होते आणि कॅमेराचा सामना कसा करायचा हे त्याला शिकवले होते.
या सिनेमादरम्यान सुशांत आणि या युवा क्रिकेटपटूची चांगलीच गट्टी जमली होती. सुशांत आता मोठ्या स्तरावर आला होता. पण युवा खेळाडूचा संघर्ष मात्र सुरु होता. पण आपण एक दिवस मोठ्या स्तरावर जाणार आणि आपली ओळख निर्माण करणार, असे या युवा खेळाडूचे स्वप्न होते. हे स्वप्न त्याने सुशांतला सांगितले होते. त्याचबरोबर जेव्हा मी मोठ्या स्तरावर क्रिकेटपटू होईन तेव्हाच तुला भेटेन, असे वचनही त्याने सुशांतला दिलेले होते. पण हे वचन मात्र आता पूर्ण होऊ शकत नाही.
हा युवा क्रिकेटपटू आहे तरी कोण…स्थानिक पातळीवर दिमाखदार कामगिरी करून या क्रिकेटपटूने चांगले नाव कमावले. त्यामुळे आयपीएलच्या या मोसमासाठी त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील करुन घेतले. पण या वर्षी आयपीएल करोना व्हायरसमुळे पुढे ढकलली गेली आणि लॉकडाऊनंतर आता आयपीएल कधी होणार, ह सांगता येत नाही. पण मुंबई इंडियन्सकडून खेळल्यावर आपण सुशांतला भेटायचे, असे युवा क्रिकेटपटू दिग्विजय देशमुखने ठरवले होते. पण त्यापूर्वीच सुशांतने या जगाचा निरोप घेतला, त्यामुळे आता दिग्विजयचे हे स्वप्न आता अधुरेच राहणार आहे.
याबाबत दिग्विजय म्हणाला की, ” ‘काय पो छे’ हा सिनेमा करताना माझी आणि सुशांतची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी मी जेव्हा मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळेन तेव्हाच तुला भेटेन, असे वचन मी त्याला दिले होते. पण सुशांतच्या निधनानंतर हे माझे वचन अधुरेच राहणार आहे.”
मुंबई इंडियन्स या संघाने याबाबत एक पोस्ट केली आहे. जेव्हा दिग्विजय आयपीएल खेळायला उतरेल तेव्हा त्याचा सिनेमामध्ये गुरु असलेला सुशांत हे चित्र पाहून स्वर्गात आनंदी होईल, असे या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. ‘काय पो छे’ या सिनेमामध्ये सुशांत हा दिग्विजयचा गुरु असल्याचे दाखवले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times