माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची ओळख करून देण्याची गरज नाही. कारण आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर गावस्कर यांनी क्रिकेट विश्वात आपले नाव कमावले होते. पण गावस्कर यांनाही ज्यांची गोलंदाजी आव्हानात्मक वाटायची, असे गोयल हे गोलंदाज होते. गावस्कर यांनी आपल्या पुस्तकामध्येही त्यांचा उल्लेख केला होता. गावस्कर यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटले होते की, ” मी भारतीय क्रिकेटमध्ये ज्या गोलंदाजांचा सामना केला त्यामध्ये गोयल यांचे नाव पहिल्या स्थानावर असेल. गोयल यांच्या गोलंदाजीचा सामना करताना मला बऱ्याच समस्या जाणवल्या होत्या.”
भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील गोयल हे एक दिग्गज गोलंदाज होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक ६४० बळी गोयल यांच्या नावावर होत्या. एकूण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ७५० विकेट्स मिळवले होते. वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत ते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होते. पण या दिग्गज गोलंदाजाला भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करायला मात्र मिळाले नाही.
काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने गोयल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हा पुरस्कार त्यांना ज्या व्यक्तीने दिला ज्यांच्यामुळे गोयल यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नव्हते, असे त्यावेळी चाहते म्हणत होते. ते खेळाडू होते भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी.
गोयल यांना एकदा भारताच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले होते. १९७४-७५ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील कसोटी सामना बंगळुरु येथे खेळवण्यात येणार होता. त्यावेळी बिशनसिंग बेदी यांना काही कारणास्तव संघाबाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी गोयल यांना भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची सर्वात चांगली संधी होती. पण त्यावेळी अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीत गोयल यांचे नाव घेण्यात आले नव्हते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times