मुंबई- करोनाच्या संकटकाळातही खेळांकडे दुर्लक्ष करु नका… घरात… घराच्या अंगणात… घराच्या गच्चीवर… सोसायटी आवारात… शक्य आहे त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन खेळ अवश्य खेळा. दररोज व्यायाम करा, शारिरिक हालचाली वाढवणारे, मानसिक तणाव कमी करणारे खेळच करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास आपल्याला मदत करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेला २३ जून या जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार यांनी घरात रहा… खेळत रहा… तंदुरुस्त रहा, असा मंत्र करोनाशी लढण्यासाठी दिला आहे. यावेळी औचित्य होते ते जागतिक ऑलिम्पिक दिनाचे. २३ जून हा जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. २३ जून १८९४ या दिवशी ऑलिम्पिकच्या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर १९४८ साली हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिन () म्हणून साजरा केला जातो.

“आपल्यापैकी प्रत्येकाने किमान एकतरी खेळ अवश्य खेळला पाहिजे. खेळामुळे शरीर, मन तंदुरुस्त राहते. खेळभावना वाढीस लागते. करोनाच्या संकटामुळे सध्या मैदानावर खेळण्यास निर्बंध असले तरी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात, आवारात, गच्चीवर जिथं शक्य आहे तिथं खेळलं पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे,” असेही अजित पवार म्हणाले.

जागतिक ऑलिम्पिक दिनी, दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करुन खेळाडूंना एकत्रित केले जाते. मुलांमध्ये, युवकांमध्ये खेळांचा प्रसार व्हावा यासाठी उपक्रम राबविले जातात. यंदा त्यापैकी काहीही करता येत नसल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.

जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा देत असताना, महाराष्ट्राचा, देशाचा, भारतीय क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवण्यासाठी योगदान दिलेल्या खेळाडूंचे, क्रीडा संघटक, क्रीडा कार्यकर्त्यांचे, क्रीडा रसिकांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून आभारही मानले आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here