यानंतर जोकोविच म्हणाला की, ” जेव्हा मी बेलग्रेड येथे आलो होतो तेव्हा माझी करोनाची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीनंतर मी करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर माझ्या पत्नीलाही करोना झाला आहे, पण मुलं मात्र करोना पॉझिटीव्ह सापडलेली नाहीत. माझ्यामुळे जर कोणाला बाधा झाली असेल तर त्याची मी माफी मागतो. आता १४ दिवस मला क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. पाच दिवसांनी माझी दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.”
जोकोविचने मदतनिधीसाठी आयोजित केलेल्या टेनिस स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन टेनिसपटूंना आज सकाळी करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. जागतिक रँकिंगमध्ये ३३व्या क्रमांकावर असलेला बोर्ना चॉरिच आणि १९व्या क्रमांवरील ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना लागण झाली होती. क्रोएशियाला गेल्या आठवड्यात स्पर्धेचा पूर्वार्ध पार पडला तर आता येत्या वीकेंडला सर्बियात या स्पर्धांचे आयोजन होणार होते. टेनिसपटूंना करोना झाल्याने आता या दोन्ही देशांच्या निष्काळजीपणाबाबत चिंता व्यक्त होते आहे. आता या स्पर्धेचा दुसरा टप्पा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला असून बरेच सुरक्षेचे उपाय आता या खेळाडूंना पाळावे लागणार आहेत.
या स्पर्धेत दिमित्रोव्ह, चॉरिच यांच्यासह जोकोविच आणि मरिन चिलिचसारखे आघाडीचे टेनिसपटू सहभागी झाले होते. आता स्पर्धेचा दुसरा टप्पा रद्द करण्यात आला आहे. झदार येथील आद्रियाटिक रिसॉर्टमध्ये चॉरिच वि. दिमित्रोव्ह या अशी लढत गेल्या शनिवारी पार पडली होती. चॉरिच म्हणाला, ‘मी करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळलो आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपया स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी’. आपली तब्येत ठणठणीत असून करोनाची कोणतीही लक्षणेही नाहीत. केवळ चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी घ्यावी लागणार आहे, असेही चॉरिचने सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times