सध्याच्या घडीला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रवी शास्त्री यांच्याकडे आहे. पण या पदासाठी बीसीसीआयची सर्वात पहिली पसंती होती ती म्हणजे भारताचा माजी तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविड. पण द्रविडच्या गळ्यात मात्र प्रशिक्षकपदाची माळ पडली नाही, नेमकं घडलं तरी काय…

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता, असे म्हटले जात होते. विराट आणि त्यावेळी प्रशिक्षक असलेले कुंबळे यांच्यामध्ये वाद सुरु झाला होता. त्यामुळे विराटला प्रशिक्षकपदी कुंबळे नको होते, असे त्यावेळी म्हटले जात होते. भारतीय संघ २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. या अंतिम फेरीत संघाने प्रथम फलंदाजी करायची, असा निर्णय बैठकीमध्ये घेतला होता. पण विराटने नाणेफेक जिंकली आणि त्याने पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. त्यावेळी विराट आणि कुंबळे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर कुंबळे यांनी भारताचे प्रशिक्षकपद सोडले होते. त्यानंतर भारताच्या नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरु झाला होता.

द्रविड हा त्यावेळी भारताच्या युवा संघाचे प्रशिक्षकपद भूषवत होता. युवा संघाबरोबर त्यांचे काम चांगले चालले होते. त्यांच्यासाठी द्रविड काही रणनीतीही आखत होता. त्यावेळी युवा संघाबरोबर असलेल्या द्रविडला आपण भारताच्या मुख्य संघाचे प्रशिक्षकपद द्यायला हवे, असे बीसीसीआयला वाटत होते. कारण द्रविड हा युवा खेळाडूंना चांगला ओळखत होता. त्यांच्यामधील गुणवत्तेला त्याने चांगला आकार दिला होता. त्यामुळे द्रविड हा भारताच्या मुख्य संघाच्या प्रशिक्षकपदासाठी योग्य असल्याचे बीसीसीआयला वाटत होते.

कोहलीबरोबर वाद झाल्यावर कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडले. त्यावेळी संघाचे प्रशिक्षकपद हे रवी शास्त्री यांना मिळावे, असे कोहलीला वाटत असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले, मुलाखती घेतल्या आणि शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.

द्रविडला प्रशिक्षकपद का मिळाले नाही…बीसीसीआयच माजी प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय यांनी याबाबत एक खुलासा केला आहे. राय म्हणाले की, ” कुंबळे यांच्यानंतर भारताच्या प्रशिक्षकपदी द्रविड यांची निवड करण्यात यावी, असे बीसीसीआयला वाटत होते. त्यावेळी बीसीसीआयने याबाबत द्रविड यांना विचारणादेखील केली होती. कारण त्यावेळी द्रविड हे या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत, असे बीसीसीआयला वाटत होते. पण द्रविड यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली नाही.”

द्रविडने ऑफर का स्वीकारली नाही…द्रविडने प्रशिक्षकपदाची ऑफर का स्वीकारली नाही, याबाबतही राय यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “प्रशिक्षकपदाच्या ऑफरबद्दल द्रविडला बीसीसीआयने विचारणा केली होती आणि त्याने ही ऑफर स्वीकारली नाही. तो म्हणाला की, मला दोन मुलं आहेत, त्यांना सध्या माझी जास्त गरज आहे. भारतीय संघ बऱ्याचदा परदेश दौऱ्यावर जात असतो, त्यामुळे मला मुलांकडे लक्ष देता येणार नाही. या कौटुंबिक कारणास्तव द्रविडने ही ऑफर नाकारली होती.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here