नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत समावेश असलेल्या सौरव गांगुलीचा आज ४८वा वाढदिवस आहे. ८ जुलै १९७२ रोजी जन्मलेला गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आहे.

प्रिन्स ऑफ कोलकाता आणि रॉयल बंगाल टायगर या नावाने प्रसिद्ध असलेल्या गांगुलीने करिअरमध्ये अनेक विक्रम आणि पराक्रम केले. गांगुलीचे कर्णधापद आणि फलंदाजीची स्टाइल आज देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. भारतीय क्रिकेटला नवी ओळख निर्माण करून देण्याचे काम गांगुलीने केले.

वाचा-
गांगुलीने १९९६ साली इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शतकी खेळी करत कसोटी पदार्पण केले. त्याने पहिल्या कसोटीत १३१ धावा केल्या. भारताकडून त्याने ११३ कसोटीत ७ हजार २१२ तर ३११ वनडेत ११ हजार ३६३ धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने १८३ धावांची सर्वोच्च खेळी केली होती.

गांगुलीने वनडेत २२ शतक केलीत. त्यापैकी १८ शतक भारताबाहेर आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली २८ कसोटीपैकी भारताने ११ मध्ये विजय मिळवला. गांगुलीबाबत एक गोष्ट फार कमी जणांना माहित आहे की, तो मुख्यता उजव्या हाताने फलंदाजी करायचा. पण भावाचे क्रिकेटचे किट वापरता यावे म्हणून त्याने डाव्या हाताने फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

२००० साली मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट संकटात सापडले होते. तेव्हा गांगुलीने कर्णधारपदाची धुरा हाती घेतली. लोकांचा क्रिकेट आणि खेळाडूंवरील विश्वास कमी झाल्याचा तो काळ होता. तेव्हा कसोटी क्रमवारीत भारत ८व्या स्थानावर होता आणि जेव्हा गांगुली निवृत्त झाला तेव्हा भारत दुसऱ्या स्थानावर होता.

वाचा-
गांगुलीने २००७ साली पाकिस्तानविरुद्ध २३९ धावांची द्विशतकी खेळी केली. त्यानंतर २००८ मध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने अखेरची कसोटी खेळली. २००० साली केनियात झालेल्या आयसीसी नॉकआउट कप स्पर्धेत गांगुलीने पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व एका मोठ्या स्पर्धेत केले. या स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पण २००२ मध्ये भारताने लंकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयुक्त विजेतेपद मिळवले.

२००२ साली नेटवेस्ट फायनल भारतीय चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ३२५ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद १४६ झाली होती. तेव्हा मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी देशाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयानंतर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून हवेत फिरवला होता.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००३च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. १९८३ नंतर भारताने प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव केला. पण भारतीय चाहत्यांच्या मनात गांगुली आणि संघाबद्दलचे प्रेम आणखी वाढले. निवृत्तीनंतर आता सध्या तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. त्याआधी तो बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here