करोना व्हायरसनंतर पहिला क्रिकेट सामना आजपासून सुरु होत आहे. चार महिन्यांनंतर चाहत्यांना आज पहिल्यांदा क्रिकेटचा सामना लाइव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे. करोना व्हायरसमुळे गेल्या चार महिन्यांमध्ये एकही क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना झालेला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना चार महिन्यांमध्ये एकही लाइव्ह सामना पाहता आला नव्हता. पण त्यांची ही प्रतिक्षा काही मिनिटांतच आता संपुष्टात येणार आहे. कारण आज दुपारी ३.३० वाजल्यापासून चाहत्यांना क्रिकेटचा लाइव्ह सामना पाहता येणार आहे. पण करोना व्हायरसनंतर क्रिकेटमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आयसीसीने करोना व्हायरसनंतर खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेटचे नवीन नियम बनवले आहेत. या नवीन नियमांनुसारच आता क्रिकेट खेळावे लागणार आहे. काय आहे करोना व्हायरसनंतर सुरु होणाऱ्या क्रिकेटचे नवीन नियम, जाणून घ्या…

यापूर्वी क्रिकेटमध्ये त्रयस्थ पंच ठेवण्याचा नियम होता. पण करोना व्हायरसमुळे हा नियम शिथील करण्यात आला आहे. आता आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी स्थानिक पंचही काम करू शकतात, असे आयसीसीने म्हटले आहे. या नियमाचा किती परीणाम खेळावर होतो, हेदेखील पाहावे लागणार आहे. त्याचबरोबर वर्णद्वेषाचा विरोध करण्यासाठी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू एक खास लोगो आपल्या जर्सीवर लावून मैदानात उतरणार आहेत. आम्ही वर्णद्वेषाला जुमानत नाही, असा संदेश यावेळी आयसीसीला या माध्यमातून द्यायचा आहे.

फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ सेलिब्रेशन करत असल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे. यावेळी खेळाडू टाळ्या देऊन किंवा एकमेकांना आलिंगन देऊन सेलिब्रेशन करत होते. पण आता ठराविक अंतर ठेवून त्यांना हे सेलिब्रेशन करावे लागणार आहे. त्याचबरोबर आता ज्या खेळाडूला खेळाडूसाठी राखीव खेळाडूही देण्यात येणार आहे. मैदानात खेळत असताना जर एखाद्या खेळाडूची तब्येत बिघडली तर त्याच्या जागी लगेच राखीव खेळाडू दिला जाणार आहे.

चेंडूला चकाकी देण्यासाठी यापूर्वी खेळाडू थुंकी, लाळ किंवा घामाचा वापर करत होते. पण करोना व्हायरसमुळे सर्व काही बदललेले आहे आणि त्यामुळेच चेंडूला चकाकी देण्यासाठी खेळाडूंना या गोष्टींचा वापर आता करता येणार नाही. त्यामुळे करोनानंतर गोलंदाजांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कारण जर चेंडूला चांगली चकाकी मिळाली नाही तर त्याचा परीणाम त्यांच्या गोलंदाजीवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांना फलंदाजाला बाद करणे आता अजून अवघड बनू शकते.

करोना व्हायरसनंतर आयसीसीने पंचांच्या विरोधात न्याय मागण्याच्या प्रक्रीयेमध्ये म्हणजेच डीआरएसमध्ये वाढ केल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या पूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक डावासाठी दोन डीआरएस देण्यात येत होते, तर मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये प्रत्येकी एक डीआरएस देण्यात आला होता. पण करोना व्हायरसनंतर कसोटी क्रिकेटमध्ये तीन आणि वनडे व ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दोन डीआरएस देण्यात येतील.त्यामुळे करोना नंतरचा हा नियम सर्वात महत्वाचा मानला जात आहे.

आयसीसीने करोना व्हायरसनंतर खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेटसाठी काही नवीन नियम बनवले आहेत. हे नियम सुरक्षिततेचे उपाय डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले आहेत. जेणेकरून करोनाचा क्रिकेटमध्ये प्रवेश होऊ नये आणि खेळाला धक्का बसू नये. त्यामुळे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर खेळाडू या नियमांचे मैदानात पालन करत असल्याचे पाहायला मिळाले तर पंच त्यांना ताकिद देणार आहेत. पंच दोनदा या खेळाडूला ताकिद देतील. पण त्यानंतर तिसऱ्यांदाही त्यांनी नियम पाळले नाहीत तर संघाला पाच धावांचा दंड भारावा लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here