करोना व्हायरसमुळे क्रिकेट ठप्प पडलेले होते. गेल्या चार महिन्यांमध्ये चाहत्यांना एकही लाइव्ह सामना पाहता आला नव्हता. पण आज इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना सुरु झाला आणि चाहत्यांना दिलासा मिळाला. पण या सामन्याची अनोखी सुरुवात झालेली पाहायला मिळाली.
चार महिन्यांनंतर पहिला क्रिकेटचा सामना पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण यावेळी पावसाने चाहत्यांची थोडी निराशा केली. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे हा सामना उशिरा सुरु करण्यात आला. या सामन्यात एकही धाव झालेली असताना इंग्लंडला आपली पहिली विकेट गमवावी लागली होती. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीची गोष्ट मात्र चाहते विसरू शकलेले नाहीत.
हा सामना सुरु करण्यापूर्वी सर्व खेळाडू मैदानात एकत्र जमले होते. त्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या जागेवर गेले आणि सामना सुरु होण्यापूर्वी ते आपल्या गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले. कारण सध्याच्या घडीला जगभरात वर्णद्वेषाविरोधात आंदोलन सुरु आहे. वर्णद्वेषाला विरोध करण्यासाठी सर्व खेळाडू सामना सुरु होण्यापूर्वी मैदानात आपल्या गुडघ्यावर बसले होते. त्याचबरोबर सर्व खेळाडूंनी वर्णद्वेषाला विरोध करण्यासाठी आपल्या जर्सीवर लोगोही लावले होते. जेव्हा हा प्रकार सुरुवातीला घडला तेव्हा कोणालाही नेमके काय घडत आहे, हे समजत नव्हते. पण कालांतराने समालोचन करणाऱ्या व्यक्तींनी ही गोष्ट सांगितली. त्याचबरोबर आयसीसी, वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटरवर हे फोटो पोस्ट केले आणि हे नेमके का करत आहोत, त्याचे कारणही सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times