मुंबई : भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषक रद्द करण्याची घोषणा करून पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. मागील काही महिने करोनाच्या संकटाने क्रीडा स्पर्धा रोखण्यात आल्या होत्या. त्यात क्रिकेटप्रेमींना श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषकाची उत्सुकता लागली होती. मात्र भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी आशिया चषक रद्द झाल्याचे जाहीर केले. या निर्णयाने स्पर्धेच्या आशेवर बसलेला पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून भारताचा लौकिक आहे. दोन वेळा विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट मंडळाच्या आगामी स्पर्धांबाबत क्रिकेट प्रेमींमध्ये नेहमीच उत्सुकता असते. यंदा आशिया चषकाचे श्रीलंकेत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामना होणार होता. त्यामुळे साहजिकच या स्पर्धेकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले होते.

दरम्यान करोनामुळे देशातील आयपीएल पुढे ढकलण्यात आली. ही स्पर्धा दरवर्षी मार्च ते मे या दोन महिन्यात होते. मात्र करोनाच्या साथीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आयपीएलच्या आयोजनाचा सुवर्णमध्य काढण्यात ‘बीसीसीआय’ गुंतलेली असताना पाकिस्तान मात्र आशिया चषकाबाबत आग्रही होता. आशिया चषक नियोजनानुसार श्रीलंकेत झाल्यास आयपीएलचे नियोजन कोलमडले असते. त्यामुळे पाकिस्तान आशिया चषक होण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सुरुंग लावला.

आशिया चषकाचे यजमान श्रीलंका क्रिकेट बोर्डाला विश्वासात घेऊन गांगुलीने आशिया चषकावर एक महत्वाचे विधान केले. एका खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने आशिया चषक रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तनाची दुसऱ्यांदा विकेट काढली. यापूर्वी आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तोंडावर पाडलं होते.

यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारतीय क्रिकेट मंडळाने पाकिस्तानात जाण्यास साफ नकार दिला. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीत (दुबई) ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव पाक क्रिकेट बोर्डाने ठेवला होता. मात्र याच वेळी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यजमान होण्यासाठी प्रस्ताव दिला आणि भारताने श्रीलंकेची निवड केली. त्यामुळे यंदा आशिया चषक श्रीलंकेत होणार होता. आयपीएल होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय क्रिकेट बोर्डाने चांगलाच धडा शिकवला आहे. करोनाचा धोका पाहता श्रीलंकेने आशिया चषकासाठी आयोजन करण्यास पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. मात्र आयपीएलच्या आयोजनासाठी भारतीय क्रिकेट मंडळ श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांचा पर्याय तपासत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here