लंडन: करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची ग्रँड स्लॅम रद्द करण्यात आली आहे. मात्र, या स्पर्धेत प्रवेश मिळवू शकणाऱ्या टेनिसपटूंना चिंता करण्याचे कारण नाही. या स्पर्धेच्या पारितोषिक रकमेचे ६२० खेळाडूंमध्ये वाटप करणार असल्याचे ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने शुक्रवारी जाहीर केले.

विम्बल्डन स्पर्धा २९ जून ते १२ जुलैदरम्यान होणार होती. मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द करण्यात आली. क्लबने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की आम्ही या स्थितीत आहोत की बक्षिसाच्या रकमेचे वाटप करू शकू. जागतिक क्रमवारीनुसार या वर्षी विम्बल्डनच्या मुख्य फेरीत आणि पात्रता फेरीत प्रवेश मिळवू शकणाऱ्या ६२० खेळाडूना ही रक्कम देण्यात येईल. क्लबला विमा कंपनीकडून ९५० कोटी रुपये मिळाले आहेत.

वाचा-

स्पर्धा रद्द झाल्याने यजमानांना २४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, २००३मध्ये क्लबने विमा पॉलिसी अपडेट केली होती. त्यामुळे क्लबला ९५० कोटी रुपये विम्याच्या रकमेतून मिळणार आहेत. क्लब दरवर्षी इंशुरन्स कंपनीला १५ कोटी रुपयांचा हप्ता देतो.

क्रमवारीनुसार मानांकन
दरम्यान, पुढील वर्षीच्या विम्बल्डनमधील पुरुष एकेरीची क्रमवारी ही जागतिक क्रमवारीनुसार ठरविली जाणार आहे. विम्बल्डन पुढील वर्षी २८ जून ते ११ जुलैदरम्यान होणार आहे. ग्रास कोर्टवरील कामगिरीनुसार मानांकनाचा नियम २००२ पासून यजमान अमलात आणत आहे. महिला मानांकनात कुठलाही बदल नसेल.

अशी होणार विभागणी (सुमारे रक्कम)
२५६ मुख्य फेरीतील खेळाडू – प्रत्येकी २३ लाख ७९ हजार रुपये

२२४ पात्रता फेरीतील खेळाडू – प्रत्येकी ११ लाख ८९ हजार रुपये

१२० दुहेरीतील खेळाडू – प्रत्येकी ६ लाख

१६ व्हीलचेअर खेळाडू – प्रत्येकी ५ लाख ७१ हजार

४ क्वाड व्हीलचेअर खेळाडू – प्रत्येकी ४ लाख ७५ हजार

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here