चार महिन्यांनंतर सुरु झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा खेळाडू जखमी झाला आहे. त्याची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला थेट मैदानाबाहरे हलवण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यामध्ये करोनानंतर पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळवण्यात आली आहे. या मालिकेतील आजच्या पाचव्या दिवशी ही गोष्ट पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी ही घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे.

वाचा-

इंग्लंडने वेस्ट इंडिजपुढे जिंकण्यासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिजचाा संघ मैदानात उतरला. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा भेदक गोलंदाजी करत होता. त्याच्या एका खतरनाक चेंडूवर वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्बेल हा दुखापतग्रस्त झाला. कॅम्बेलची दुखापत ही एवढी गंभीर होती की, त्याला थेट मैदानाबाहेरच नेण्यात आले होते. यापूर्वी जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अॅशेस मालिका खेळवली गेली होती. तेव्हा आर्चरचा एक चेंडू स्टीव्हन स्मिथलाही लागला होता. त्यावेळी स्मिथ हा गंभीर जखमी झाला होता आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.

सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा संघ ३१३ धावांमध्ये आटोपला. त्यावेळी त्यांनी वेस्ट इंडिजला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले होते. यावेळी तिखट मारा करताना आर्चरने दोन फलंदाजांना बाद केले, तर कॅम्बेलला जायबंदी केले. कॅम्बेलला जेव्हा आर्चरचा चेंडू लागला तेव्हा तो लंगडताना पाहायला मिळाला. यापूर्वी आर्चरने एक यॉर्करचा चेंडू टाकला होता, त्यावेळी हा चेंडू कॅम्बेलच्या अंगठ्याला लागला होता. कॅम्बेलच्या अंगठ्याला जबर दुखापत झाली असल्याचे म्हटले जात आहे. आता वैद्यकीय चाचणीनंतरच कॅम्बेलची दुखापत किती गंभीर स्वरुपाची आहे, हे समजू शकेल. दुसऱ्या डावात कॅम्बेल दुखापतीमुळे फक्त ११ चेंडू खेळू शकला आणि एका धावेवर असताना तो निवृत्त झाला. कॅम्बेलाल डॉक्टर आणि एका खेळाडूच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here