भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघात कोहलीही होता. या भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. कारण एके ठिकाणी जिथे संघात सचिन तेंडुलकरसारखा महान आणि अनुभवी क्रिकेटपटू होता, तिथेच कोहलीसारखे सळसळते रक्तही होते. त्यामुळे या संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी विराटच्या प्रतिभेला चांगला आकार दिल्याचे पाहायला मिळाले होते.
एकदा भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेटची मालिका सुरु होती. विराट त्यावेळी चांगला लयीत दिसत होता. पण त्याने एक फटका हवेत मारला. त्यावेळी तो बाद झाला आणि त्याची फलंदाजी संपुष्टात आली. त्यावेळी गॅरी यांनी त्याला चांगले मार्गदर्शन केले होते. त्यामुळेच कोहली या चुकांमधून शिकू शकला आणि एक चांगला क्रिकेटपटू बनू शकला.
याबाबत गॅरी यांनी सांगितले की, ” एकदा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट चांगल्या लयीत येईल, असे वाटत होते. कारण त्यावेळी तो चकाही तरी ३० धावांवर खेळत होता. पण त्यावेळी विराटने एक चूक केली आणि तो बाद झाला. विराटने त्यावेळी लाँग ऑनवरून षटकार मारायला गेला आणि बाद झाला होता.”
गॅरी यांनी नेमका कोणता सल्ला दिला…
कोहली बाद झाल्यावर गॅरी यांनी त्याला एक सल्ला दिला होता. याबाबत गॅरी म्हणाले की, ” विराट जेव्हा तो फटका मारून बाद झाला, तेव्हा मी त्याला एकच गोष्ट सांगितली. तू जो फटका हवेत मारला तोच फटका जमिनीवरून मारला असता तर बाद झाला नसतास. चेंडू हवेत मारण्याचा मोह आपल्याला बऱ्याचदा होतो. पण हवेत फटका मारल्यावर विकेटही जाऊ शकते. त्यामुळे ही चूक यापुढे करू नकोस. विराटने ही गोष्ट मनावर घेतली आणि चूक सुधारली. कारण त्यानंतरच्या पुढच्या सामन्यातच विराटने शतक झळकावले होते.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times