भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असलेला हार्दिक पंड्या हा सहसा कधी भावनांमध्ये वाहून जाणारा खेळाडू नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो एक बोल्ड, धाडसी असा खेळाडू आहे. मात्र, आज रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना इतका अटीतटीचा आणि रोमहर्षक होता की या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हार्दिकलाही आपल्या डोळ्यांमधील अश्रू रोखताच आले नाही.
वडिलांची आली आठवण
पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर बोलताना हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांची आवर्जून आठवण काढली. आजचा सामना, आमची माझी खेळी माझ्या वडिलांना खूप आवडली असती. मला क्रिकेटचे चांगली प्रशिक्षण मिळावे यासाठी माझे वडील सुरतहून वडोदरा येथे आले. त्यांनी मुलांसाठी खूप केले असे म्हणत हार्दिक भावुक झाला. त्यानंतर तो अश्रू रोखू शकला नाही.
हार्दिकच्या चेहऱ्यावर बोलताना आनंद ओसंडून वाहत होता. तो म्हणाला की विराटची ही सर्वोत्तम खेळी आहे. तो चांगली फिनिशर आहे. आजची स्थिती अतिशय कठीण होती. त्यात तो उत्तम खेळला हीच त्याची महानता आहे.
मी विराटला एकच सांगत होतो की पाकिस्तानी खेळाडू चांगली बॉलिंग करत आहेत पण आपण शेवटपर्यंत लढू. आपण चांगली भागीगारी करू या. आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती. मात्र पुढे मी रिस्क घेतली. तसे मी विराटला सांगितलेही, असेही तो पुढे म्हणाला.
१६० धावांचा पाठलाग करत असताना भारताची अवस्था ३१/४ अशी झाली आणि भारतीय क्रिकेटप्रेमी चिंताग्रस्त झाले. ही परिस्थिती पाहता मेन इन ब्लू टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जातील अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, हार्दिकसह कोहलीने भारताला या परिस्थितीतून बाहेर काढले. या दोघांनी ७८ चेंडूत पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात हार्दिक बाद झाला. मात्र, पुढे विराटने भारताच्या विजयाचा मार्ग तयार केला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times