आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी खास ठरला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI) महिला क्रिकेटपटूंना दिवाळीचं खास गिफ्टचं दिलं आहे. बीसीसीआयने आता वेतन समानता धोरण लागू केलं आहे, याअंतर्गत महिला क्रिकेटपटूंनाही पुरुषांच्या बरोबरीनेच मॅच फी मिळेल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. या घोषणेनंतर आता अनेक क्रिकेटप्रेमींमध्ये हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे, की या निर्णयानंतर आता महिला क्रिकेटर्सची मॅच फी किती वाढणार? आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका दिवसाच्या सामन्यासाठी सिनिअर महिला क्रिकेटपटूंना २० हजार रुपये फी मिळत होती. ही फी अंडर-१९ पुरुष क्रिकेटरच्या फी इतकी होती. तर एका दिवसाच्या मॅचसाठी सिनिअर पुरुष क्रिकेटरची फी जवळपास ६० हजार रुपये इतरी आहे. अशात महिलांची फी पुरुष क्रिकेटरच्या तुलनेत तिप्पट कमी आहे.

महिलांना किती आहे मॅचसाठीची फी

पुरुष खेळाडूला मॅचची फी म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. तर पुरुषांना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी ६ लाख रुपये दिले जातात. तसंच पुरुषांना T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका मॅचसाठी ३ लाख रुपये मिळतात. नियमांनुसार, आता महिला क्रिकेटरला कोणत्याही एक वनडे किंवा टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचसाठी १ लाख रुपये मिळतात. तर एका कसोटी सामन्यासाठी अर्थात टेस्ट मॅचसाठी एक लाख रुपये प्रतिदिन असे ४ लाख रुपये मिळतात.

पुरुष क्रिकेटर्सला किती मिळते मॅच फी?

एका टेस्ट मॅचसाठी १५ लाख रुपये, एका वनडे मॅचसाठी ६ लाख रुपये आणि एका टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. महत्त्वाची बाब म्हणजे बीसीसीआयने लागू केलेलं नवं धोरण केवळ मॅच फीबाबत आहे, केंद्रीय कराराबद्दल या कोणतीही माहिती नाही. म्हणजेच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये अजूनही महिला आणि पुरुषांच्या फीमध्ये मोठी तफावत आहे. पुरुषांसाठी चार कॅटेगरी, तर महिलांसाठी केवळ तीन कॅटेगरी आहेत.

महिला – पुरुषांच्या कॅटगरीमध्ये मोठी तफावत

पुरुष क्रिकेटर्सना A कॅटेगरीमध्ये ५ कोटी रुपये वर्षाला मिळतात, तर महिला क्रिकेटर्सना A कॅटेगरीमध्ये केवळ ५० लाख रुपये मिळतात. इथे तब्बल १० पटींचं अंतर आहे. A+ कॅटेगरी असणाऱ्या पुरुष खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. महिला खेळाडूंना A+ कॅटेगरी नाही. पुरुषांच्या B कॅटेगरीसाठी ३ कोटी, C कॅटेगरीमधील पुरुष क्रिकेटर्सना १ कोटी रुपये वर्षाला मिळतात. तर B कॅटेगरी महिला खेळाडूंना ३० लाख रुपये आणि C कॅटेगरी महिला क्रिकेटर्सना १० लाख रुपये वर्षाला मिळतात.

समान मॅच फी लागू करणारं पहिलं बोर्ड

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांना समान वेतन देण्याचा उपक्रम पहिल्यांदा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) या वर्षी जुलैमध्ये सुरू केला होता. न्यूझीलंड क्रिकेट हे सारखी मॅच फी लागू करणारं पहिलं बोर्ड होतं. त्यांनी सर्वात आधी महिला आणि पुरुषांना समान फी देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला होता. याअंतर्गत आंतरराष्ट्रीयसह देशांतर्गत क्रिकेटपटूंनाही सर्व स्पर्धांमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी समान फी मिळेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

158 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here