Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: 4 Nov 2022, 10:11 pm

T 20 World Cup : ऑस्ट्रेलिया हा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा गतविजेता होता, पण आता त्यांच्यावरच ही वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियाला हा सामान मोठ्या फरकाने जिंकण्याची संधी चालून आली होती. पण रशिदमुळे त्यांना त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. आता ऑस्ट्रेलियाला जर सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांच्यापुढे फक्त एकच पर्याय आहे, कोणता पाहा…

 

T 20 World Cup
सौजन्य-ट्विटर
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा संघ आज विजयी ठरला खरा, पण या विजयानंतरही त्यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊ शकते. यावेळी ऑस्ट्रेलियाला फक्त एकटा रशिद खान नडल्याचे पाहायला मिळाले आणि त्याच्या एकट्यामुळेच हा गेम पलटल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत १६८ धावा केल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलने यावेळी ३२ चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या उभारता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. त्यांनी अफगाणिस्तानच्या सहा फलंदाजांना १०३ धावांवर तंबूत धाडले होते. त्यामुळे आता मोठ्या फरकाने ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकणार असे दिसत होते. पण त्यानंतर रशिद खान फलंदाजीला आला आणि त्याने संपूर्ण कमीकरणच बदलून टाकले. कारण रशिदने यावेळी २३ चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ४८ धावांची खेळी साकारली. रशिदच्या या खेळीमुळे अफगाणिस्तानच्या संघाला विजयाची आशा दिसत होती. पण रशिदला यावेळी संघाला विजय मिळवून देता आला नाही आणि त्यांना ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. पण अफगाणिस्तानला विजय मिळता आला नसला तरी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सेमी फायनलच्या आशा मात्र धुसर केल्या.

ऑस्ट्रेलियाला हा सामान मोठ्या फरकाने जिंकण्याची संधी चालून आली होती. पण रशिदमुळे त्यांना फक्त ४ धावांनी विजय मिळवता आला. आता गुणतालिकेत त्यांचे सात गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. पण शनिवारी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना जर इंग्लंडने जिंकला तर त्यांचेही सात गुण होतील आणि ते रनरेटच्या जोरावर सेमी फायनलमध्ये जातील. पण जर हा सामना श्रीलंकेने जिंकला तरच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये जाता येणार आहे, नाही तर यजमानांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. ऑस्ट्रेलिया हा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा गतविजेता होता, पण आता त्यांच्यावरच ही वेळ आली आहे. त्यामुळे आता शनिवारच्या सामन्यात इंग्लंड जिंकते की श्रीलंका यांच्यावर त्यांचा सेमी फायनलमधील प्रवेश ठरणार आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here