अॅडलेड : नेंदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का देत वर्ल्ड कपमधून बाहेर केल्यानंतर भारतीय संघाचा सेमीफायनमधील प्रवेश नक्की झाला. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात दमदार विजय मिळवत भारताने सन्मानाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. सेमीफायनलमध्ये भारताची लढत बलाढ्य इंग्लंडच्या संघाशी असणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या सामन्यात इंग्लंडला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. मात्र या सामन्यासाठी भारतीय संघात महत्त्वपूर्ण बदल करण्याचे संकेत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत.

अॅडलेडच्या खेळपट्टीनुसार भारतीय संघात बदल केले जातील, असं या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. अॅडलेडची खेळपट्टी संथ गतीच्या गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे सेमीफायनलच्या सामन्यात अक्षर पटलेच्या जागी फिरकीपटू युजवेंद्र चहलला संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरलेल्या ऋषभ पंतच्या जागी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचं संघात पुनरागमन होऊ शकतं.

रोहितचा खराब फॉर्म करणार त्याचा घात, टी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार?

राहुल द्रविड नेमकं काय म्हणाले?

भारतीय संघातील बदलाविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल द्रविड म्हणाले की, ‘१५ जणांच्या स्कॉडमधील प्रत्येकाविषयी आम्ही सकारात्मक आहोत. या १५ खेळाडूंपैकी कोणाचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यानंतर त्यातील कोणीही भारतीय संघाला कमकुवत करणार नाही. आम्ही अॅडलेडच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊ. अॅडलेडच्या मैदानात आज झालेले काही सामने मी पाहिले. तिथली खेळपट्टी संथ असल्याचं दिसत आहे. तसंच फिरकीला साथ देणारी ही खेळपट्टी आहे. त्यामुळे आम्ही तेथील परिस्थितीनुसार संघाची निवड करू,’ असं द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी पार पडलेली भारत विरुद्ध झिम्बाब्वे ही लढत अगदीच एकतर्फी झाली. गटात पाकिस्तानला पराभूत करणारा आणि बांगलादेशला विजयासाठी संघर्ष करायला लावणारा झिम्बाब्वे भारतापुढे अगदीच कमकुवत ठरला. सूर्यकुमार यादव याने अखेरच्या काही षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८६ धावा केल्या. ही यंदाच्या वर्ल्ड कपमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यानंतर भारताने झिम्बाब्वेचा डाव १७.२ षटकांत ११५ धावांत गुंडाळला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here