भलेही भारताचा संघ नसला तरी शौकीन कोल्हापुरकर ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी आणि पोर्तुगाल संघाला सर्वाधिक पसंती देत आहेत. त्याचं प्रतिबिंब गल्लीबोळातून दिसू लागलं आहे. अर्जेंटिनाचा मेस्सी, ब्राझीलचा नेमार, पोर्तुगालचा रोनोल्डो या खेळाडूंची शहराच्या प्रमुख चौकात कटआऊट, डिजिटल फलक आणि काही घरांच्या भितींही चाहत्यांनी रंगवल्या आहेत. आपल्या देशात सर्वात मोठा क्रिकेटचा चाहता वर्ग आहे. मात्र कोल्हापूर याला अपवाद म्हणावा लागेल. कारण या क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल प्रेमी कोल्हापुरमध्ये आहेत. कोल्हापुरात अनेक पेठा आहेत आणि या प्रत्येक पेठेत फुटबॉल प्रेमी आहेत. प्रत्येक पेठाचा एक फुटबॉल संघ देखील आहे. दरवर्षी या पेठापेठांमध्ये फुटबॉलची मॅच होत असते. यावेळी हजारो कोल्हापुरकर या मॅच पाहायला गर्दी करतात.

कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमी

अशातच आजपासून फिफा वर्ल्डकप सुरू झाला आहे. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये जरी भारताचा संघ नसला तरी कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींनी वेगवेगळ्या देशाच्या संघाना आणि खेळाडूंना आपलं समर्थन जाहीर केलं आहे. समर्थन जाहीर करत संपूर्ण शहरातील तालीम आणि पेठांमध्ये ब्राझील, पोर्तुगाल, नेमारसह अनेक देशाच्या झेंड्याचे पताके, पोस्टर, फ्लेक्स लावले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी भिंतीदेखील रंगवण्यात आल्या आहेत. तर अनेक चौकात फुटबॉलचे सामने लाईव्ह पाहण्यासाठी एलईडीची सोय करण्यात येत आहेत.

फिफा वर्ल्ड कपचा कोल्हापुरात फिव्हर

आजपासून कतारमध्ये सुरू झालेल्या फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर कोल्हापुरात दिसत असून कोल्हापुरातील सायबर चौकात लावलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कटआऊटने चांगलंच लक्ष वेधलं आहे. कट्टर ख्रिस्तियानो साहेब समर्थक असं या कटआऊटवर लिहिलं आहे. तर, आझाद चौकात मेस्सीचं मोठे कटआऊट लावले आहेत. त्याशिवाय मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीमजवळ नेमारचं कटआऊट घरावर लावले आहे.

पेठापेठांमध्ये पोस्टर्स, बॅनर्स

मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीत संघर्ष ग्रुपने आपली संपूर्ण गल्ली वेगवेगळया देशाच्या पताकांनी सजवली आहे. यासह एमएमपी ग्रुपने ब्राझीलचा झेंडा लावला आहे. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळजवळ विविध खेळाडूंची चित्रं भिंतीवर रंगवली आहेत. सरदार तालीमजवळ नेमार (ज्युनियर) चे पोस्टर इमारतीवर लावले आहे. शिवाजी पेठेतील सासने गल्लीत वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे लावले आहेत. रंकाळा चौपाटी इथे तर ब्राझीलच्या चाहत्यांनी रंकाळा उद्यानावर कटआऊट लावले आहेत.

३५०० कोटींची उलाढाल

आजपासून सुरू झालेल्या फिफा वर्ल्ड कपसाठी कोट्यवधी रुपये मोजण्यात आले आहेत. २९ दिवसात ३२ संघ खेळणार असून या संघात ६४ सामने खेळवले जाणार आहेत. ३५०० कोटींची उलाढाल या स्पर्धेसाठी होत आहे. फिफा वर्ल्डकप २०२२ चं कतारमध्ये आयोजन झालं असून ही स्पर्धा २० नोव्हेंबर ते फायनल १८ डिसेंबरपर्यंत खेळली जाणार आहे. हेही वाचा – FIFA World Cup 2022: सेक्स टॉय ते दारु-सिगारेट…यंदा फिफा वर्ल्ड कपमध्ये या ५ गोष्टी बॅन

कोल्हापुरात ठिकठिकाणी फिफा फिव्हर

आतापर्यंत ब्राझीलने ५ वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. तर जर्मनी आणि इटलीने ४ वेळा जिंकला आहे. फ्रान्स, अर्जेंटिना आणि उरुग्वेने प्रत्येकी दोन वेळी, तर इंग्लंड आणि स्पेनने प्रत्येकी एक-एक वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे. आता यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ नसला तरी कोल्हापुरात मात्र ठिकठिकाणी फिफाचा फिव्हर दिसतो आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here