अँड्रॉइडच्या आगामी आवृत्तीतील अपडेटमुळे स्मार्टफोनधारक लवकरच सध्या मर्यादा असणार्या ४ जीबीपेक्षा आकारमानाने मोठे व्हिडीओदेखील रेकॉर्ड करू शकतील.
आगामी काही महिन्यांमध्ये अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमची अकरावी आवृत्ती युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश असेल हे निश्चीत. यातील एक फिचर हे स्मार्टफोनधारकांसाठी अतिशय उपयुक्त सिध्द होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कोणताही स्मार्टफोनधारक जास्तीत जास्त ४ जीबी इतक्या आकारमानाचा व्हिडीओ हा एकाच फाईलमध्ये चित्रीत करू शकतो. अँड्रॉइड ११ या प्रणालीत ही मर्यादा काढण्यात येणार आहे. यामुळे ४ जीबींपेक्षा जास्त आकारमानाचे मोठे व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहेत.
सद्यस्थतीत बहुतांश स्मार्टफोन युजर्स एचडी अथवा फुल एचडी या क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्ड करतात. तथापि, अलीकडच्या काळात अनेक मॉडेल्समध्ये फोर-के क्षमतेच्या चित्रीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. खरं तर, स्मार्टफोनमध्ये कॅमेर्याच्या पिक्सल्सची क्षमता वाढत असून इनबिल्ट स्टोअरेजदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमिवर, आजवर असणारी ४ जीबी व्हिडीओची क्षमता ही कमी पडत आहे. विशेष करून जास्त वेळ चालणारे कार्यक्रम, विविध सामने आदींना एकाच फाईलमध्ये चित्रीत करण्यासाठी ४ जीबी मर्यादा अँड्रॉइड ११ मध्ये काढून टाकली जाणार आहे. यामुळे जास्त क्षमतेचे तसे दीर्घ काळापर्यंचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. अर्थात, व्हिडीओ कॅमेर्याची जागा स्मार्टफोन घेण्याचा मार्गदेखील यातून मोकळा होणार आहे.