स्वाती भट

शाळेमध्ये असताना ऑफ पिरियडला किंवा चालू वर्गामध्येसुद्धा मागच्या बाकावर बसून चोर-पोलीस हा चिठ्ठ्यांचा खेळ खेळला जायचा. बसल्याजागी खेळता येणारा तो खेळ अनेकांना आजही आठवत असेल. त्याचंच आधुनिक रूप असलेला ‘माफिया’ हा खेळ आता शाळेचा वर्ग सोडून ऑफिसच्या वर्गात आला आहे. सध्या सुरू असलेल्या, ऑफिसांच्या व्हर्च्युअल वर्गात तो रंगू लागला आहे. नोकरी करणाऱ्या काही तरुणांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना युट्यूबवर हिट ठरतेय.

वाचाः

लॉकडाऊनच्या काळात घरी पत्ते, सापशिडी, कॅरम यासारखे खेळ पुन्हा एकदा खेळण्यात बरीच कुटुंबं रंगली. परंतु, रोज भेटणारा आपल्या ऑफिसचा परिवार मात्र घरीच ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये बंदिस्त झाला. कर्मचाऱ्यांना घरून एकट्यानं काम करताना येणारा कंटाळा घालवण्यासाठी कंपन्यासुद्धा वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. कुठे एकत्र योग सेशन्स, व्हर्च्युअल लंच, अशा वेगवेगळ्या कल्पनांमधून ऑफिसमधले सगळे कर्मचारी ऑनलाईन एकत्र येऊन मजा करू शकतील आणि कर्मचाऱ्यांची संघभावना टिकून राहील यासाठी प्रयत्न होत आहेत. मुंबईतल्या काही अशाच वर्किंग तरुणांच्या ग्रुपनं यावर ‘द माफिया ओरिजिनल्स’ नावानं एक गेमिंग युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. ‘ऑफिसच्या कँटीनमध्ये मोकळ्या वेळात आम्ही ‘माफिया’ हा खेळ खेळायचो. लॉकडाउन सुरू झाल्यावर मग व्हिडीओ मीटिंगवर हा खेळ खेळायला सुरुवात केली. त्यातूनच युट्यूब चॅनेल सुरू करायची कल्पना सुचली’, असं अनिरुद्ध मिश्रा आणि प्रफुल्ल आजगेकर यांनी सांगितलं.

वाचाः

या दोघांनी आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून ‘द माफिया ओरिजिनल्स’ हे चॅनल सुरू केलं आहे. हा खेळ जुना असला, तरी या ग्रुपनं त्याला चॅनलच्या माध्यमातून एखाद्या रिअॅलिटी शोचं रूप दिलं आहे. चोर कोण हे शोधणं आणि स्वतःला गेममध्ये शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी बाजू लढवणं यासारख्या अनेक डाव-प्रतिडावांसह हा ऑनलाइन खेळ रंगतो. त्याचे व्हिडीओ ‘द माफिया ओरिजिनल्स’ युट्यूब चॅनलवर अपलोड केले जातात. यामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी होण्याची संधी हा ग्रुप त्यांच्या चॅनलद्वारे देत आहे. नव्यानं सहभागी होणाऱ्यांसाठी खास डेमो आणि प्रॅक्टिस सेशनसुद्धा ते घरबसल्या आयोजित करतात. लवकरच लाइव्ह स्पर्धेसाठी ते नियोजन करत आहेत.

वाचाः

वर्क फ्रॉम होम पूर्णतः किंवा अंशतः पुढील वर्षीही सुरूच ठेवलं जाईल असं दिसतंय. कामाचं हे बदलतं स्वरूप स्वीकारताना कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकट्यानं काम करतानाचा त्यांचा ताण हलका व्हावा यासाठी अशा प्रकारे कामाच्या नव्या पद्धती अवलंबायला हव्या, ज्यातून त्यांचा उत्साह वाढेल. एक टीम म्हणून काम करत असल्याचा अनुभव त्यांना येईल.

– निकेत करजगीवाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here