रामेश्वर जगदाळे

आताच्या करोना संकटाच्या काळात कुठेही गेलात तरी, शरीराचं मोजल्याशिवाय आत जाऊ दिलं जात नाही. मात्र, त्या यंत्राच्या क्षमतेपेक्षा अधिक अंतर ठेवून मोजलं जाणारं शरीराचं तापमान योग्य आहे का? असा प्रश्न नील सावंत या मुंबईकर तरुणाला पडला. या प्रश्नाच्या उत्तराचा शोधसुद्धा त्यानंच लावला. त्यासाठी त्यानं लॉकडाउनच्या एका महिन्यात ‘टचलेस थर्मल स्कॅनर’ हे एक खास उपकरण तयार केलं.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी, म्हणजेच बँका, सरकारी कार्यालयं, खासगी कार्यालयं, दुकानं अशा ठिकाणी येणारे कर्मचारी, अभ्यागतांच्या शरीराचं तापमान तपासूनच त्यांना आत सोडलं जातं. ९५ ते १०० या दरम्यान शरीराचं तापमान असणाऱ्या लोकांनाच प्रवेश दिला जातो. मात्र तापमान तपासताना ते दरवेळी योग्य तितकं अंतर ठेवून तपासलं जातं का? हा प्रश्न नील सावंत या इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरला पडला. कारण, ही तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मनातसुद्धा भीती असायची की आपल्याला काही झालं तर? म्हणूनच यावर उपाय म्हणून नीलनं, हात न लावता आणि योग्य तेवढं अंतर पाळून तापमान तपासणारा थर्मल स्कॅनर तयार करायचं ठरवलं. त्यातूनच ‘टचलेस थर्मल स्कॅनर’ हे उपकरण त्यानं महिनाभरात तयार केलं.

भारतात येऊन स्वतःचं काहीतरी करावं या उद्देशानं नीलनं अमेरिकेतील मोठ्या कंपनीतील नोकरी सोडली आणि तो इथे आला होता. या उपकरणाविषयी तो सांगतो, की ‘लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी लोकांचं तापमान तपासण्यासाठी वापर होणाऱ्या यंत्रांचा आणि ज्या पद्धतीने ते तपासलं जायचं त्यामध्ये मला काही त्रुटी दिसून आल्या. इंजिनीअर म्हणून रिसर्च आणि डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टींचा अनुभव होता. म्हणून मग भारतातील पहिलं ‘टचलेस थर्मल स्कॅनर’ तयार करता आलं.’

नीलनं तयार केलेल्या या यंत्राला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणं, काही सरकारी कार्यालयात या यंत्राचा वापर होताना दिसतो आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकांचे रोजगार गेलेले असतानाच, ‘टचलेस थर्मल स्कॅनर’ तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे यंत्राचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या आणि काही इंजिनीअर्सना रोजगार मिळाला आहे.

डिव्हाइसची वैशिष्ट्यं

० डिव्हाइसपासून ५ सेंटीमीटर अंतरापर्यंत येणाऱ्या व्यक्तीच्या तापमानाची नोंद.

० स्पर्श करण्याची, चार्जिंगचीही गरज नाही

० बॅटरी बदलण्याची आवश्यकता नाही

० तापमान कळतं अवघ्या १ सेकंदात

करोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या खबरदारीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आलेल्या लोकांच्या शरीराचं तापमान तपासणं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्या करताना त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या, म्हणून हे डिव्हाइस तयार करायचं ठरवलं. दिवस-रात्र काम करून कमी वेळेत हे डिव्हाइस तयार झालं आहे. याचा वापर होताना पाहून आनंद होतोय.

– नील सावंत (नुओस होम ऑटोमेशन)

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here