अनिकेत जाधव, कॉलेज क्लब रिपोर्टर

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं ‘क्रॉपीफाय’ हे अॅप शहा आणि अँकर इंजिनीअरिंग कॉलेजच्या CODE4C@USE या विद्यार्थ्यांच्या टीमनं तयार केलं. इस्रोनं दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटकरीता तयार केलेल्या या अॅपनं ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेत चमक दाखवली आणि इस्रोकडून कौतुकाची थापही मिळवली. कॉलेजच्या माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागामध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या निशित मिस्त्री, ख्याती प्रजापती, विरती पारेख, पार्थ जोशी, चार्मी संघवी आणि निल शाह या विद्यार्थ्यांचा या टीममध्ये समावेश आहे. शेतकरी, त्याचबरोबर डेटा अॅनॅलिटिक्स क्षेत्रात काम करणारी व्यक्ती यांना उपयोगी ठरेल असं हे ॲप या विद्यार्थ्यांनी इस्रोकरीता तयार केलं आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं हे ॲप बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं होतं. गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद या नोडल सेंटरला इस्रोनं दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटकरीता शहा आणि अँकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे अॅप तयार करून दिलं. या अॅपला प्रथम क्रमांक मिळाला आहे. इस्रोनं या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे. कॉलेजमधील माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापिका जलपा मेहता आणि डॉ. क्रांती घाग यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

‘क्रॉपीफाय’ॲपबद्दल

पिकाच्या काढलेल्या एका फोटोवरून किंवा एखाद्या छोट्याशा व्हिडीओवरून, त्या पिकाकरीता लागणारं हवामान, आर्द्रता, माती, पाणी यासारखी माहिती ॲपमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर फक्त फोटोवरून ते पीक कोणतं आहे हेसुद्धा ओळखण्याची क्षमता ॲपमध्ये आहे. संपूर्ण भारतात कोणकोणती पिकं घेतली जातात त्यांची माहिती विविध नकाशांच्या आधारे या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आपल्या शेतात कोणतं पीक घ्यायचं आहे, याची माहिती शेतकऱ्यांना हवी असेल, तर शेतात जाऊन शेताचं लोकेशन ॲपमध्ये नोंदवून वातावरणाची माहिती टाकली असता, त्या शेतात कोणती पिकं घेता येतील आणि त्या पिकांना आवश्यक वातावरणाची माहिती लगेचच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर हवामानविषयक माहितीसुद्धा यामध्ये उपलब्ध आहे.

मागील वर्षी आम्ही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि डीप ब्ल्यू सीझन फाईव्ह या स्पर्धांत सहभागी होण्याकरीता खूप प्रयत्न केले. पण, तेव्हा या दोन्ही स्पर्धांसाठी आमची निवड झाली नव्हती. त्यामुळे या स्पर्धांत सहभागी होता आलं नाही याची खंत मनात होती. म्हणूनच आमच्या टीमचं हॅकेथॉनमध्ये जिंकण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्नच आम्हाला सतत प्रेरणा देत होतं. आमच्या टीममधील सर्वजणच नवीन नवीन कल्पनांवर काम करण्याकरीता नेहमीच उत्सुक असायचे. आमची संपूर्ण टीम आणि मार्गदर्शक शिक्षक यामुळेच आम्ही जिंकू शकलो.

– निश्चित मिस्त्री (टीम लीडर)

अॅपची वैशिष्ट्यं?

० फोटो पाहून पीक ओळखण्याची क्षमता

० शेतीसाठी उपयुक्त माहिती होणार उपलब्ध

० नकाशाद्वारे भारतभरातील पिकांची माहिती

० फोटो, व्हिडीओवरुन पिकासाठी आवश्यक हवामानाची माहिती

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here