मंडळांनी उभारल्यात

दोन शिफ्ट्समध्ये कार्यकर्त्यांची फळी

२४ तास लाइव्ह दर्शन, हॅशटॅगवरही लक्ष

रामेश्वर जगदाळे

करोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचं रुपच बदलून गेलं आहे. मंडपात दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी नाही, लाऊडस्पीकर नाही की कुठेही धावपळ नाही. पण, यावर्षीचा गणेशोत्सव डिजिटली गणेशभक्तांपर्यंत पोहोचतो आहे. त्यासाठी अनेक मंडळांनी डिजिटल यंत्रणा उभारली असून, ती सांभाळण्यासाठी गणेशमंडपात एक वॉर रुमच तयार करण्यात आली आहे. आयटीतज्ज्ञ असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी ही वॉर रुम सांभाळताना दिसतेय. या माध्यमातून गणेशभक्तांना लाइव्ह दर्शन, मंडळाचे विविध उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत.

करोना परिस्थितीमुळे यंदा भाविक गणेशमंडपात दर्शनासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे या डिजिटल वॉर रुमचा चांगला उपयोग होताना दिसतोय. काही मोजक्या मंडळांसाठी ही रूम नेहमीची आहे, तर काहींनी यंदा प्रथमच हा घाट घातल्याचं पाहायला मिळतो आहे. काही आयटी कार्यकर्त्यांची फळी घरून, तर काही जण मंडळात तयार केलेल्या वॉर रूमद्वारे काम करत आहेत. दरवर्षीप्रमाणे गणेशभक्तांना बाप्पाचं दर्शन ऑनलाइन २४ तास दिलं जातंय. दोन शिफ्ट्समध्ये आयटी कार्यकर्त्यांची फळी वॉररूममध्ये काम करताना दिसतेय. बाप्पाची दोन वेळची आरती, बाप्पाची सजावट आणि अनेक गोष्टी देशातील-परदेशातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लाइव्ह दाखवण्यासाठी ते काम करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर मंडळांचे हॅशटॅग चालवणं, ट्रेडिंग गोष्टींना क्रिएटीव्ह बाज देऊन मंडळाला डिजिटली लोकांसमोर ठेवणं या गोष्टी वॉररूम पार पाडते आहे.

क्रिएटीव्ह डिझाइन

मंडळाचं नाव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ग्राफिक डिझायनरची टीम काम करतेय. सोशल मीडियावर आकर्षक पद्धतीनं मंडळाचं काम पोहोचवण्यासाठी ही मंडळी क्रिएटीव्ह डिझाइन तयार करत आहेत. १० दिवसात होणाऱ्या उपक्रमांची माहिती तसंच मंडळाला भेट दिलेले मान्यवर, सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सजवून मांडल्या जातात.

केबलवर आरत्या, पूजा

विभागातील लोकांना घरबसल्या दर्शन मिळावं, म्हणून सोशल मीडियावर ‘लाइव्ह’ दर्शनाबरोबरच स्थानिक केबल चॅनलचासुद्धा आधार घेतला जातोय. विभागातील मंडळांच्या आरत्या, पूजा नागरिकांना या चॅनलद्वारे घरबसल्या बघायला मिळत आहेत. या चॅनलला मंडळांची लिंक देणं तसेच इतर गोष्टींचे अपडेट करणं अशा गोष्टी या वॉररूमद्वारे केल्या जात आहेत.

सोशल मीडिया मॅनेजमेंट

या वॉररूमची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची टीम सोशल मीडियाची आहे. ग्राफिक्स डिझायनर, कंटेंट रायटर अशा निरनिराळ्या टीम्सकडून आलेला डेटा योग्य वेळी, योग्य दिवशी आपल्या फॉलोअर्सना तसंच गणेशभक्तांना दाखवण्याचं काम ही टीम करत असते. सोशल मीडियावर आलेल्या विविध प्रकारच्या प्रश्नांना, कमेंटला उत्तरं देणं ही कामं या टीमकडे सोपवलेली असतात. सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म कसे अॅक्टिव्ह राहतील हे गणेशोत्सवादरम्यान तसेच संपूर्ण वर्षभरातसुद्धा ही टीम काम करत असते. लाइव्ह आणि इतर प्रसिद्ध माध्यमांतून किती भक्त दर्शन घेतात यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या टीमवर आहे. यंदा जवळपास सर्वच गोष्टी डिजिटली करायच्या असल्यामुळे रिसर्च आणि डेव्हलपमेंट टीमनं विशेष मेहनत घेतली. जास्तीत जास्त गणेशभक्तांपर्यंत पोचण्यासाठी कोणते कार्यक्रम आखले जावेत हे तयार करण्याचं काम या टीमकडे होतं.

सकाळी साधारण ७ वाजताच डिजिटल टीमचा दिवस सुरू होतो. आयटी क्षेत्राशी निगडित असणारे कार्यकर्ते या सर्व गोष्टींचा ताबा घेतात. जवळपास २४ तास ही टीम काम करत असते. काम करणारा प्रत्येक जण मंडळातलाच आहे. सगळे स्वतःच काम सांभाळून या गोष्टी करत असतात. मंडळाचं सोशल मीडिया अकाऊंट, वेबसाइट आणि इतर माध्यमांवर अॅक्टिव्ह रहाण्याचं काम या टीमकडे देण्यात आलं आहे.

– अद्वैत पेढामकर

मुंबईचा राजा गणेशगल्ली

(सहाय्यक खजिनदार, डिजिटल मीडिया प्रमुख)

सोशल मीडिया आणि डिजिटल गोष्टी सांभाळण्यासाठी २५ जणांची टीम काम करते आहे. मोजकी लोकं मंडळांमध्ये असतात, तर बाकी टीम घरून काम करते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही करोनाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मंडळात गर्दी होऊ नये म्हणून आम्ही सर्व गोष्टी डिजिटल माध्यमांवर प्रसारित करतो आहोत.

– प्रथमेश मातारे, सोशल मीडिया प्रमुख

( अभ्युदयनगरचा राजा सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ)

६०% मंडळांकडून चोवीस तास दर्शन

४०% मंडळांकडून सामाजिक उपक्रमांचं लाइव्ह प्रक्षेपण

५०% मंडळांची स्वतःची वेबसाइट आहे.

९०% मंडळांची स्वतःची सोशल मीडिया हँडल

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here