सौरभ शेलार, नगिनदास खांडवाला कॉलेज

काही दिवसांपूर्वीच टिकटॉकवर घातलेल्या बंदीनंतर, सीमेवर वाढलेला तणाव या पार्श्वभूमीवर तरुणांचा ‘फेव्हरेट गेम’ पबजीही लवकरच बंद होणार अशी चर्चा होती. ती खरी ठरवत केंद्र सरकारनं पब्जीचाही गेम ओव्हर केला. २०१८साली भारतात आलेल्या या गेमनं फार कमी वेळात तरुणांना वेड लावलं होतं. उच्चस्तरीय ग्राफिक्स आणि त्याला दिलेली ऑनलाइन तंत्रज्ञानाची जोड या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे हा गेम तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला होता. पब्जीचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे या ताज्या निर्णयाचं स्वागतच होताना दिसतंय.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या वर्ल्ड पब्जी लीगमध्ये भारताच्या ‘ऑरेंज रॉक्स’ या स्क्वॉडनं द्वितीय क्रमांक पटकावला होता. ‘विनर विनर चिकन डिनर’ आणि ‘जय पब्जी’ या घोषणाही तरुणांनी पब्जीसाठी दिल्या होत्या. विशेष म्हणजे मुलांबरोबरच मुलीही या खेळात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊ लागल्या. पण, या ऑनलाइन खेळामुळे तरुणांमध्ये काही मानसिक, शारीरिक आजारांची लक्षणं दिसू लागली होती. त्यावरुन चिंता व्यक्त होत होती. पब्जीचं आकर्षण इतकं वाढलं होतं की, कॉलेजांच्या फेस्टिव्हलमध्ये या खेळाची झलक पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना फेस्टला आकर्षित करण्यासाठी, पारंपरिक मैदानी खेळांबरोबरच ऑनलाइन गेम्सचाही समावेश करण्यात आला होता. पण, या सर्व ऑनलाइन गेम्समध्ये पब्जीचं पारडं नेहमीच जड राहिलं. पब्जीची वाढती क्रेझ पाहता, या खेळाचं आयोजन हमखास होऊ लागलं. त्यामुळे पब्जीच्या ऑनलाइन स्पर्धांचं प्रमाणही वाढलं. आता पब्जीवरील बंदीमुळे हा उत्साह दिसणार नसल्याचं आयोजकांकडून सांगितलं जातंय.

उत्पन्न थांबलं

काही तरुण मंडळी याकडे उत्पन्नाचं साधन म्हणूनही पाहत होते. पब्जीशी संबंधित बरीचशी युट्यूब चॅनल काही तरुणांनी सुरू केली होती. बॅटलग्राउंडवर झालेले चांगले गेम्स रेकॉर्डिंग करून, त्या चॅनलवर शेअर केले जायचे. काही वेळा लाइव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून, सुरू असणाऱ्या गेम्सचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जायचं. त्यामुळे या अशा युट्यूब चॅनेल्सना वाढत्या सबस्क्राइबर्सकडून पसंती मिळत होती. त्यांची कमाई थांबणार आहे. ‘उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मी पब्जीशी संबंधित असणारं ‘Me MLA’ हे युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. त्याला एका महिन्यात पाचशेहून अधिक सबस्क्राइबर्स मिळाले होते. आता पब्जीवर आलेल्या बंदीमुळे, या चॅनलचा काही उपयोग नाही’, असं सुशांत चव्हाण या तरुणानं सांगितलं.

खबरदारी हवीच

पब्जीवरील बंदीचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. अशा ऑनलाइन गेम्सवर फक्त बंदी घालून चालणार नाही. यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे, सरकारनं यासाठी एक चांगलं धोरण राबवणं आवश्यक आहे.

– उन्मेष जोशी, रिस्पॉन्सिबल नेटिझम

पूर्णपणे सहमत

नुकत्याच झालेल्या पब्जीच्या वर्ल्ड लीगमध्ये ‘ऑरेंज रॉक्स’ या भारताच्या स्क्वॉडनं द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये उत्सुकता वाढली होती. पण, या बंदीमुळे पब्जी प्लेअर्स काहीसे निराश झाले आहेत. तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहोत.

– शुभम देशमुख, पब्जी प्लेअर

इतर पर्याय

‘टेक्नोक्रॅट’ या आमच्या कॉलेज फेस्टिव्हलमध्ये आम्ही पब्जीचं आयोजन केलं होतं. विद्यार्थ्यांकडून त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला होता. पण, आता या निर्णयामुळे आम्हाला इतर पर्यायी ऑनलाइन गेम्सचा विचार करावा लागणार आहे.

– रोहित चौहान, पब्जी स्पर्धा आयोजक, टेक्नोक्रॅट, सिडनहॅम कॉलेज

पालकांची भूमिका महत्त्वाची

पब्जी या खेळावर अचानक बंदी घालण्यात आल्यानं त्याच्या आहारी गेलेले तरुण थोडे सैरभैर होणं साहजिक आहे. अशा वेळी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. एकटं राहणं, चिडचिड होणं किंवा सतत रागराग करणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. म्हणून पालकांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. अठरा वर्षांखालील मुलं पब्जीच्या आहारी गेली असतील, तर त्यांना जास्त जपणं आवश्यक आहे. दुसऱ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष वळवा. क्रिएटीव्ह गोष्टींमध्ये रमवण्याचा पर्याय पालकांकडे आहे. या सगळ्यातून मुलं आठ-दहा दिवसांनी बाहेर पडतील. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊ शकता.

– हरिश शेट्टी, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ

० २०१८ ला भारतात लाँच

० कमी वेळात तरुणांची पसंती

० मुलींचाही वाढता सहभाग

० मानसिक, शारीरिक दुष्परिणामांमुळे चिंता

० कॉलेज फेस्टिव्हलमध्ये झलक

० स्पर्धांमध्ये झालेलं रूपांतर

० युट्यूब चॅनलमधून उत्पन्न

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here