शब्दुली कुलकर्णी

लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या स्क्रीनटाइममध्ये कैकपटीनं वाढ झाली. शिवाय, इंटरनेटच्या वापरावर मर्यादा राहिल्या नाहीत. ऑनलाइन गेम, नेट सर्फिंग, सीरिज पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं असो किंवा ऑनलाइन टाइमपास करण्यासाठी इंटरनेटचा वापर प्रमाणाबाहेर करण्यात आला. म्हणून इंटरनेटच्या वापरावर मर्यादा घालण्यासाठी काही कुटुंबं स्वत:च घरामध्ये एकमेकांशी करत आहेत. इंटरनेटचा वापर मर्यादीत राहण्यासाठी या कराराचा उपयोग होतो.

काय असतो इंटरनेट करार?

इंटरनेट वापरावर मर्यादा राहाव्यात यासाठी इंटरनेट करार केला जातो. यामध्ये एक फॉर्म भरुन घेतला जातो. त्या फॉर्मवरील अटी वाचून घरातले सगळे सदस्य स्वाक्षरी करतात. त्या अटी घरातील सदस्यांशी चर्चा करुनच करारबद्ध केल्या जातात. नंतर कराराचं हे पत्रक घरातील दर्शनी भागात लावलं जातं. जेणेकरुन, घरात वावरताना सदस्यांचं लक्ष जावं आणि त्यातील अटींचा विसर पडू नये.

करारात असतं काय?

इंटरनेट करार म्हणजे एक प्रकारचा फॉर्म असतो. त्यात दिवसाला किती तास इंटरनेटचा वापर करणार? कशासाठी वापर करणार? सोशल मीडियावर किती वेळ ऑनलाइन जाणार? कोणत्या प्रकारची पोस्ट करणार? यासारख्या प्रश्नांचा समावेश असतो. त्यातील प्रश्नापुढे प्रत्येक सदस्यानं उत्तर लिहायचं आणि त्यावर स्वाक्षरी करायची. त्यातील अटींचं पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. इंटरनेट हे प्रभावी शस्त्र आहे. त्याचा वापर कसा केला जावा हे कळण्यासाठी करार केला जातो. इंटरनेट वापरासंबंधित पारदर्शकता आणण्यासाठी कराराचा उपयोग होतो.

करार किती कालावधीचा?

– दहा ते पंधरा दिवस

– आठवडाभर

– महिनाभर

– सहा महिने

– वर्षभर

प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या सोयीनं कराराचा कालावधी ठरवण्याची मुभा असते.

नियमांचं उल्लंघन केल्यास…

करारात दिलेला एखादा नियम मोडल्यास शिक्षा ठरलेल्या असतात. काही तास किंवा दिवस इंटरनेट वापरायचं नाही किंवा गॅजेट्सचा वापर करायचा नाही अशा साध्या शिक्षांचा यात समावेश असतो. या शिक्षा फक्त इंटनेट वापराशी संबंधित नसतात. काही कुटुंबामध्ये घरातली कामं करण्याचीसुद्धा शिक्षा दिली जाते. मुलांना शिस्त लागावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. या शिक्षा रंजक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुरक्षितता महत्त्वाची

सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग यासारख्या चुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी इंटरनेट कराराचा फायदा होत असल्याचं अनेकजण सांगतात. तसंच इंटरनेटच्या माध्यमातून पाल्याबरोबर कुठलेही गैरप्रकार होत नसल्याचं किंवा मुलांकडून चुकीचं घडत नाही ना याबद्दल कळतं. यामुळे इंटरनेटचा चुकीच्या पद्धतीनं वापर करण्यावर अंकुश लावला जातो.

डिजिटल पालकत्व

सध्या डिजिटल पालकत्व ही संकल्पना पुढे येत आहे. डिजिटल व्यासपीठावर काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे निवडण्यासाठी पाल्यांना सक्षम करणं म्हणजे डिजिटल पालकत्व होय. यामध्ये पाल्य चुकीच्या गोष्टी करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत नाही ना, किंवा इंटरनेटचा वापर करताना चुकीच्या किंवा अश्लील माहितीशी संपर्कात येत नाही ना, याची खबरदारी घेतली जाते. डिजिटल पालकत्वामध्ये इंटरनेट करार महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळे मुलांच्या इंटरनेट वापरावर बारीक नजर ठेवली जाते.

करारांमुळे स्वत:वर बंधनं किंवा मर्यादा कशा घालून घ्यायच्या हे कळतं. याचा भविष्यात फायदा होतो. नियमात राहून इंटरनेटचा वापर कसा करावा हे कळण्यास मदत होते. यामुळे निश्चितच इंटरनेटचा सजगपणे वापर करणारी पिढी घडेल.

– उन्मेष जोशी, रिस्पॉन्सिबल नेटीझम

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here