Niraj.Pandit@timesgroup.com

@nirajcpanditMT

लॉकडाउन सुरू झाला आणि आपली कामं करण्यासाठी अनेकांचा तंत्रज्ञानाशी जवळून संबंध आला. टेक्नॉलॉजी शिकलेले अधिक प्रगत झाले तर न शिकलेले साक्षर झालेत. हे सर्व घडत असताना एंटरटेन्मेंट, एज्युकेशन आणि इकॉनॉमी, म्हणजे देशाच्या आर्थिक कण्यातील हे तीन ‘ई’ तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) आणि स्मार्टफोनवर अवलंबून राहिले. यात अडचण होती ती वेगाची. मात्र येत्या काळात हे सीमोल्लंघन अधिक वेगवान होणार असून आपल्या देशात ‘फाइव्ह जी’ला सुरुवात होणार आहे.

इंटनेटचा वाढता वापर लक्षात घेता त्याचा वेग आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दूरसंचार कंपन्या सज्ज झाल्यात. यामुळे लवकरच देशात ‘५जी’चं नेट सुरू होणार आहे. कोणताही बफर न होता मनोरंजन होऊ शकणार आहे. अवघ्या काही सेकंदात मोठे व्हिडीओ डाउनलोड होऊ शकणार आहेत. हे सर्व झाल्यावर आपल्याला ऑनलाइन सुविधांचा अनुभव अधिक वृद्धींगत होणार आहे. यामुळे भविष्यात येणारी उपकरणं ही टेक्नॉलॉजीचा वापर अधिक सुखकर करणारी ठरणार आहेत.

एक्स्टेंडेड रिअॅलिटी

व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी या दोन गोष्टींचा वापर करून सध्या आपण शॉपिंग आणि अनेक ठिकाणच्या व्हर्च्युअल टूर्स करू शकतो. कोविड काळात रक्तदाब मोजण्यापासून ते रुग्ण चिकित्सा करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. दूर असलेल्या रुग्णांची चिकित्सा करण्यापासून ते नेत्र चिकित्सा यासारख्या बाबींसाठी याचा वापर झाला. येत्या काळात याचा वापर अधिक सक्षमपणे होणार असून आपल्याला अगदी घरबसल्या चष्म्याची फ्रेम निवडता येऊ शकणार आहे. शिक्षणातही याचा वापर करण्यात येणार असून, वर्गखोल्यांच्या भिंती तोडत उच्च दर्जाच्या ट्रान्समिशनच्या सहाय्यानं शिक्षण त्यातून बाहेर पडू शकणार आहे. वैद्यकीय क्षेत्रालाही हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकणार आहे.

सेवा क्षेत्रात क्रांती

क्लाउडच्या आधारे काम करणाऱ्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करत आपलं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी विविध टेक्नॉलॉजींचा वापर करून सेवा पुरवल्या जातात. येत्या काळात मनोरंजन क्षेत्रातील ऑन डिमांड सेवा सर्वच क्षेत्रांमध्ये वृद्धींगत होताना पाहायला मिळणार आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन यांच्या क्लाउड सेवांच्या आधारे तसेच विविध स्टार्टअप्स आणि संशोधकांच्या कल्पकतेनं, ज्याला पाहिजे ती सेवा हवी तेव्हा उपलब्ध करून देण्याची सुविधा मिळणार आहे.

आर्टिफिशिअल इंटलिजन्स
कोविड काळात वेअरेबल डिव्हाइसचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. आरोग्याची काळजी म्हणून, शिवाय कार्यालयीन कामकाज या दोन्ही गोष्टींसाठी वेअरेबल टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. येत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटलिजन्स) वापर करून, आपला चेहरा ओळखून आपल्याला गाणी ऐकवणारी डिव्हाइसेस बाजारात येणार आहेत. यात गुगल असिस्ट, अॅलेक्सा, सिरीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘बोले तैसा चाले’ याप्रमाणे, आपण सांगू ते ऐकणारे डिव्हाइस आपल्या हातात असणार आहे. यामुळे भविष्यात टेक्नॉलॉजीमध्ये वेगवान प्रगती होताना दिसणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here