कौस्तुभ दीक्षित

व्हॉट्सॲपने नुकतंच पेमेंट्स हे फीचर भारतीय युजर्ससाठी लाँच केलं आहे. यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरून पेमेंटची सुविधा देणारी भीम, गुगल पे, फोन-पे अशी अनेक ॲप्स आपण मोबाइलवर वापरतो. याच यूपीआयचा वापर करून व्हॉट्सॲपने पेमेंट्स फीचर सुरू केलं आहे. हे फीचर व्हॉट्सॲपमध्ये यापूर्वी इन्व्हाइट-बेसिसवर उपलब्ध होतं. भारतात व्हॉट्सॲपची लोकप्रियता पाहता यापूर्वी केवळ बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असलेलं हे फीचर आता सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. व्हॉट्सॲपमध्ये पेमेंट्स फीचर सेटअप कसं करायचं आणि ते कसं वापरायचं याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊ या…

सेटअप

– प्ले स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सॲप अपडेट करा.

– अपडेट झाल्यानंतर व्हॉट्सॲप ओपन करा आणि वर उजव्या कोपऱ्यात असलेला मेन्यू (तीन डॉट्स) उघडा.

– मेन्यूमधून Paymentsचा ऑप्शन सिलेक्ट करा.

– नंतर Add new payment method सिलेक्ट करा.

– Accept and Continue सिलेक्ट करा.

– यानंतर बँकांची यादी दिसेल. तुमचं खातं ज्या बँकेत आहे ती बँक या यादीतून निवडा.

– आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर व्हेरिफाय करावा लागेल. यासाठी तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि व्हॉट्सॲपचा नंबर एकच असणं आवश्यक आहे. ही खात्री करून घेतल्यानंतर Verify via SMS सिलेक्ट करा.

– तुमच्या नंबरचं व्हॉट्सॲप, सिम कार्ड आणि एकाच फोनमध्ये असणं आवश्यक आहे. यासाठी Allow सिलेक्ट करा.

– पुन्हा एकदा Allow सिलेक्ट करा. याने व्हॉट्सॲपला एसएमएस पाठवण्याची आणि वाचण्याची परवानगी मिळते.

– व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरला लिंक्ड असलेल्या सर्व बँक खात्याची यादी दिसेल. यातलं जे बँक खातं तुम्हाला वापरायचं असेल ते सिलेक्ट करा.

अशाप्रकारे पेमेंट्सचं सेटअप पूर्ण झालं. आता या फीचरद्वारे एकमेकांना पैसे कसे पाठवायचे हे जाणून घेऊ. ज्याप्रमाणे चॅटमधून एकमेकांना फोटो, ऑडिओ, व्हिडीओ पाठवता येतात त्याचप्रकारे आपण पैसेही पाठवू शकतो. त्यासाठी पुढील पायऱ्या फॉलो कराव्या…

– ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचं चॅट उघडा. त्या व्यक्तीनेही स्वतःच्या फोनमध्ये अपडेट करून वरीलप्रमाणे पेमेंट्सचं सेटअप केलेलं असणं आवश्यक आहे.

– मेसेज टाइप करायच्या टेक्स्ट बॉक्सच्या बाजूला असणाऱ्या यू-क्लिपवर क्लिक करून Payments सिलेक्ट करा.

– पाठवायची रक्कम टाइप करा (कमाल मर्यादा ₹ ५०००). याचबरोबर हे पैसे कशासाठी पाठवत आहोत त्याची माहितीही टाइप करता येते.

– तुमचा यूपीआय पिन व्हेरिफिकेशनसाठी टाइप करा.

– समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले गेल्यानंतर तसं कन्फर्मेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवण्याप्रमाणेच त्या व्यक्तीद्वारे आपल्याला पैसे पाठवण्याची विनंतीही करता येते. फक्त त्यासाठी Payments सिलेक्ट केल्यानंतर Pay ऐवजी Request हा पर्याय निवडावा लागतो.

याव्यतिरिक्त मेन्यू >→Payments>→ NEW PAYMENT>→ Send to a UPI ID/ Scan QR Code द्वारेही समोरच्या व्यक्तीचा UPI ID वापरून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देता/घेता येतात.

यूपीआय या सुविधेद्वारे डिजिटल इंडियामध्ये बँकेचे व्यवहार करणं सोपं झालं आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली. इतर यूपीआय ॲप्सप्रमाणेच आता व्हॉट्सॲपनेही ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोबाइल बँकिंगला आणखी चालना मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here