म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गुगलवर एखाद्या संस्थेची माहिती मिळवली जाते आणि तेथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जातो आणि त्यातून अनेक जण सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरतात. हे प्रकार वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून वित्त संस्थांच्या क्रमांकापुढील ‘संपादन’ (एडिट) हा पर्याय काढून टाकण्यात आला आहे. इतर संस्थांचे किंवा आस्थापनांचे सुरक्षित आणि योग्य क्रमांक मिळावे म्हणून सुरक्षेचे उपाय योजण्यासाठी पुढील विचार सुरू असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आली.

गुगलमध्ये येणारी विविध माहिती ही युजर्सनी अपलोड केलेली असते. ती सर्वच खरी असते असे नाही. यामुळे अनेकदा येथील क्रमांकावरून ग्राहक संबंधित संस्थेत फोन करतात आणि यातून ते सायबर गुन्हेगारीचे बळी ठरतात. असे प्रकार आजकाल वाढू लागले आहेत. अशा तक्रारी जगभरातून येत असल्याने गुगलने प्राथमिक स्तरावर वित्तीय संस्थांचे क्रमांक संपादन करण्याचा पर्याय बंद केला आहे. उर्वरित संस्था व त्यांचा सुरक्षित करण्यासाठी आणि त्यातून पुन्हा असे सायबर गुन्हे होऊ नयेत यासाठी काय करता येईल यावर काम सुरू असल्याचेही गुगलने स्पष्ट केले. मंगळवारी ‘सेफर इंटरनेट डे’च्या निमित्ताने गुगलने सुरक्षेबाबत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ही माहिती दिली.

सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गुगल इंडियाने केंद्र सरकार आणि ‘डेटा सिक्युरिटी कौन्सिल फॉर इंडिया’च्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जागरुकता करण्यासाठी या हॅशटॅगच्या माध्यमातून जागरुकता मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून देशभरात विविध भाषांमध्ये जागृती केली जाणार आहे. आपला पासवर्ड अनेकदा सोपा असतो, यामुळे तो हॅकरला हॅक करणे सोपे जाते. यातूनच अनेकदा हे गुन्हे होतात. आपला पासवर्ड सुरक्षित आहे की नाही, हे पाहण्यासाठी password.google.com या पोर्टलवर सर्व तपशील समजू शकणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. यामुळे ‘डेटा सिक्युरिटी कौन्सिल फॉर इंडिया’तर्फे ‘डिजिटल पेमेंट अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या काळात युजर्सची सुरक्षा हा मुद्दाही महत्त्वाचा असून त्यासाठी कौन्सिलतर्फे गुगलशी सहकार्य करण्यात आले आहे. यामुळे येत्या वर्षभरात गुगलच्या सहकार्याने सायबर सुरक्षेचे अभियान राबविले जाणार असल्याचे यावेळी कौन्सिलचे अमित घोष यांनी सांगितले. यासाठी हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषेतही जागरुकता व्हिडीओ तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले. हे व्हिडीओ www.dsci.in या साइटवर उपलब्ध आहेत.

काही सुरक्षा टीप्स

– पासवर्ड सुरक्षा तपासण्यासाठी password.google.com वर लॉगइन करा
– फोनमध्ये अनावश्यक व घातक अॅप्स ठेवू नका
– ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट ठेवा
– गुगल अकाऊंटच्या सुरक्षेसाठी g.co/securitycheckup ला भेट द्या

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here