नवी दिल्लीः सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर डोळेझाकपणे विश्वास ठेवू नये, असे वारंवार सांगूनही काही जण त्या चुका करतात. त्यांच्या एका खोट्या मेसेजमुळे तसेच एका चुकीच्या मेसेजमुळे कुणाचे किती नुकसान होईल, याचा अंदाज बांधला जात नाही. सध्या करोनाची जगभरात भीती पसरली आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जनजागृती केली जात आहे. परंतु, व्हॉट्सअ्ॅपवर एक खोटा मेसेज आल्याने महाराष्ट्रातील पॉल्ट्री फॉर्मचे तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात पॉल्ट्री फार्मिंग करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मोबाइलवर एक मेसेज आला होता. ज्यात दावा करण्यात आला होता की, अंडे आणि चिकन खाल्ल्याने करोना व्हायरसची लागण होते. हा मेसेज थोड्याच वेळात वाऱ्यासारखा पसरला. हा खोटा मेसेज केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. तर तो संपूर्ण देशभर पसरला आहे. या एका खोट्या मेसेजमुळे अंड्यांचा भाव आणि चिकनचे दर ९० टक्क्यांपर्यंत खाली उतरले आहेत. या एका मेसेजमुळे लाखो शेतकऱ्यांना आता घर चालवणे मुश्किल आहे. एका इंग्रजी वृत्त वाहिनीने ऑल इंडिया पॉल्ट्री ब्रिडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश चितपुरी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ही माहिती समोर आली आहे. एका चुकीच्या माहितीमुळे देशातील सर्वच भागातील चिकनचे दर कमी होऊन ते ५ ते १० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दररोज १६० कोटींचे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले.

देशात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात समोर आले आहेत. हा मेसेजही महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे. त्यामुळे लाखो लोक करोनाच्या भीतीमुळे चिकन आणि अंडे खायला मागे पुढे पाहात आहेत. त्यामुळे शंभर रुपयांत चार कोंबड्या विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. पंजाबमध्ये चिकन १५ रुपये किलोने विकले जात आहे.

चिकन – अंडे खाल्ल्याने करोना होतो का?

चिकन आणि अंडे खाल्ल्याने करोना होत असल्याचे असे एकही प्रकरण अद्याप समोर आले नाही. यासारख्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. यासंबंधीची अफवा पसरवण्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याने म्हटले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here