Niraj.Pandit@timesgroup.com

@nirajcpanditMT

स्टेपअॅप

एखादी वैज्ञानिक संकल्पना आपल्याला शिकायची असेल तर ती वाचून शिकण्या ऐवजी प्रयोगातून चांगली लक्षात राहते. असंच इतिहास, भूगोल, भाषा सर्वच विषयांचं आहे. यामुळेच जगभरात कृतिशील शिक्षणाची मूहर्तमेढ रोवली गेली. जी आपल्या देशातही आता राबवण्यात येऊ लागली आहे. मात्र ही शिक्षणपद्धतील तळागाळातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल असं नाही. नेमकं हेच ओळखून आयआयटीचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक प्रविण त्यागी यांनी खेळा आणि शिका या संकल्पनेवार आधारित स्टेपअॅप नावाच्या अॅपची निर्मिती केली. यात सीबीएसईपासून ते राज्य शिक्षण मंडळाच्या पाचवी ते बारावीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन शिकता येणार आहे. यात प्रत्येक संकल्पनेवर गेम्सच्या माध्यमातून सखोल विवेचन करण्यात आलं आहे. इतकेच नव्हे तर ही संकल्पना विद्यार्थ्याला समजली आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक संकल्पनेवर प्रश्न मंजुषाही देण्यात आली आहे. जर यात विद्यार्थी चुकला तर त्याला पुन्हा ती संकल्पना समजावून सांगितली जाते. या अॅपच्या माध्यमातून आपला पाल्य काय करत आहे त्याची प्रगती किती झाली याचा रिअल टाइम डेटा पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. विविध राज्य सरकार या अॅपचा वापर त्यांच्या शाळेत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत. यात महाराष्ट्र सरकारचाही समावेश आहे. अगदी अल्पदरात ही शिक्षण पद्धती उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक कोटी ते ५० कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही मिळवण्याची संधी आहे. सध्या हे अॅप इंग्रजीत उपलब्ध असले तरी लवकरच मराठी व हिंदीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ऑनलाइन शाळा

करोना व्हायरसमुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात केंद्रीय विद्यालयांचाही समावेश आहे. तर काही खासगी शाळांचाही समावेश आहे. अशावेळी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील सुमारे ८०० शाळा सुरू राहू शकणार आहेत. ‘लीड स्कूल@होम’ या उपक्रमाअंतर्गत वर्गातील सर्व विद्यार्थी शिक्षकांशी ऑनलाइन पद्धतीनं जोडले जाऊ शकतात आणि त्यांचा नियमित वर्ग सुरू राहू शकतो. अशा पद्धतीचं तंत्रस्नेही शिक्षण ‘LEAD स्कूल’नं उपलब्ध करून दिलं आहे. यात पुस्तकविरहित शाळा ही संकल्पना मांडण्यात आली आहे. यात शाळा ऑनलाइन भरून मुलांनी आज कोणता गृहपाठ करायचा आहे याचा तपशीलही पालकांना अॅपच्या माध्यमातून समजू शकणार आहे. तसंच वर्गात मुलांनी कोणता अभ्यास केला ते आपल्या मुलाला किती समजलं याचा तपशीलही पालकांना मिळू शकणार आहे.

शंकांचं समाधान

अभ्यास करताना येणाऱ्या विविध शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही शिक्षकांची मदत घेतात. मात्र आता जर सुट्टी लागली आहे आणि तुम्हाला शिक्षकांना भेटता येणार नाही अशावेळी तुम्ही डाऊटहंट या अॅपच्या माध्यमातून तुमच्या शंकांचं समाधान करू शकता. या अॅपवर नववी, दहावी, अकरावी, बारावी याचबरोबर आयआयटी जेईई मेन्स, अॅडव्हान्स, नीट अशा अभ्यासक्रमांचे हजारो व्हिडीओज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास सोपं जातं. या अॅपवर किंवा वेबसाइटवर तुम्ही गेलात की तुम्ही तुम्हाला जो डाऊट आहे तो तिथे दिलेल्या बॉक्समध्ये लिहू शकता. याचबरोबर त्याचा वापर करून तुम्ही त्याची इमेजही अपलोड करू शकता. ती रिड करून तुम्हाला उत्तर दिलं जातं. हे उत्तर तुम्ही पीडीएफमध्ये डाऊनलोड करू शकता. यामुळे हे अॅप इतरांपेक्षा वेगळं ठरत आहे. विज्ञान विषयासाठी हे अॅप सर्वाधिक उपयुक्त असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

टेस्टबूक

सध्या शाळा-कॉलेजस बंद झाले असले तरीही हा हंगाम अनेक स्पर्धा परीक्षांचा विशेषत: सरकारी नोकरीत संधी असलेल्या स्पर्धा परीक्षांचा आहे. यामुळे हे क्लासेसही करोनामुळे बंद करण्यात आले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी टेस्टबूक ही वेबसाइट नक्कीच उपयुक्त ठरू शकते. आशुतोष कुमार, मनोज मुन्ना, प्रवीण अग्रवाल आणि नरेंद अग्रवाल या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या टीमनं या वेबसाइटची निर्मिती केली. देशातील विविध राज्यांच्या सरकारी नोकरीतील संधीची केवळ माहिती तरुणांपर्यंत पोहोचवून उपयोग नाही तर ही नोकरी मिळवण्यासाठी नेमके काय करावं, परीक्षेची तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन मिळणंही आवश्यक आहे. यामुळे या तरुणांनी या वेबसाइटची सुरुवात केली. या वेबसाइटवर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात येणारे सुमारे तीन अब्जांहून अधिक प्रश्नांची बँक आहे. या साइटवर सध्या ४० लाख युजर्स उपलब्ध असून त्यापैकी चार लाख युजर्स हे राज्यातील आहेत. या वेबसाइटवर १५० हून अधिक सरकारी परीक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here