स्मार्टफोनचा वापर आता नियमित झाला आहे. प्रत्येकाच्या हातात आज स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, अनेकदा फोन खराब झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. फोन खराब झाल्यावर सर्वात प्रथम तर आपण घरीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अपयश आल्यानंतर अखेर सर्व्हिस सेंटरकडे धाव घ्यावी लागते. परंतु, सर्व्हिस सेंटरमध्ये फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. अनेकदा कोणताही विचार न करता फोनला दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये देतो. फोनमध्ये आपला महत्त्वाचा खासगी डेटा असतो. अशा स्थितीमध्ये फोन सर्व्हिस सेंटरमध्ये देण्याआधी विचार करायला हवा. फोनमध्ये बँक खात्याची माहिती, खासगी फोटो आणि सोशल मीडिया अकाउंट लॉग इन केले असते. त्यामुळे फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी खबरदारी घ्यावी. फोन पूर्णपणे बंद झाला असल्यास काहीही करता येणार नाही. मात्र, फोन सुरू असल्यास तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

​डेटा बॅकअप

फोन खराब झाल्यानंतर आपण काळजीत पडतो व घाई गडबडीत दुरुस्तीसाठी सर्व्हिंस सेंटरला देतो. मात्र, डिव्हाइस त्वरित दुरुस्त व्हावा या नादात फोनचा बॅकअप घेणे विसरू नये. फोटोजच्या बॅकअपसाठी तुम्ही ऑनलाइन क्लाउड सर्व्हिसचा वापर करू शकता. अथवा, फोटोज, व्हिडिओ, कागदपत्रं अथवा अन्य मीडिया फाइल्सला पेन ड्राइव्ह/हार्ड डिस्कमध्ये कॉपी करून घ्या. थोडक्यात, तुमच्याकडे जे स्टोरेज ऑप्शन असेल त्यामध्ये फोनचा डेटा कॉपी करून घ्या.

​खासगी फोटो डिलीट करा

आपल्या सर्वांच्याच फोनमध्ये काही खासगी फोटो असतात, जे आपण इतरांना दाखवू शकत नाही. मित्र, कुटुंब इतर जवळील व्यक्तीची प्रायव्हसी ही तुमची जबाबदारी असते. जर तुमच्या फोनमध्ये देखील असे काही खासगी फोटो असल्यास डिव्हाइस सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीला देण्याआधी हे फोटो डिलीट करा अथवा इतर डिव्हाइसमध्ये कॉपी करून घ्या. तुम्ही ब्लूटूथ अथवा इतर माध्यमातून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये हे फोटो, व्हिडिओ सहज ट्रांसफर करू शकता.

​मेमरी आणि सिम कार्ड काढून घ्या

फोन दुरुस्तीसाठी देताना अनेकदा गडबडीमध्ये आपण सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढायला विसरतो. मेमरी कार्ड आणि सिम कार्ड दोन्ही महत्त्वाचे असून, इतर व्यक्तींना सापडल्यास याचा चुकीच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सिम कार्ड व मेमरी कार्ड काढायला विसरू नये.

महत्त्वाचे मेसेज डिलीट करा

फोनमध्ये बँक अथवा इतर महत्त्वाचे मेसेज असतात. फोन सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीसाठी देण्याआधी हे मेसेज डिलीट करायला विसरू नका.

​E Wallet अ‍ॅप्स आणि बँकिंग अ‍ॅप्स

ई-वॉलेट-

इंटरनेटमुळे आज प्रत्येकाच्या फोनमध्ये डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स असतात. त्यामुळे फोन दुरुस्तीला देण्याआधी हे बँकिंग अ‍ॅप्स आणि ई-वॉलेट अ‍ॅप्स अनइंस्टॉल करायला विसरू नका. कारण सर्व्हिस सेंटरला फोन दिल्यानंतर सर्व डेटा डिलीट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व अ‍ॅप्स व माहिती डिलीट करावी.

सोशल मीडिया खाती

फोन सर्व्हिस सेंटरमध्ये देण्याआधी Facebook, Twitter आणि WhatsApp सारखे सोशल मीडिया अकाउंट्स लॉग आउट करायला विसरू नका.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here