स्वाती भट

करोनाच्या संसर्गामुळे सध्या प्रत्येकाला घरी राहावं लागतंय. त्यामुळे भटकंतीप्रमी मंडळींची पंचाईत झालीय खरी. पण, हे घरी राहणं आता अत्यावश्यक आहे हे त्यांनाही माहीत आहे. म्हणूनच भटकंतीप्रेमी नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट उपाय शोधून काढले आहेत. सोशल मीडिया अकाऊंटचा वापर करत त्यांची ऑनलाइन फिरती सुरू आहे. विविध पर्यटनस्थळांना ते इ-भेटी देत आहेत. पूर्वी भेट दिलेल्या ठिकाणांचे फोटो नव्यानं अपलोड करत त्याबरोबर चेक-इनसुद्धा टाकत आहेत. त्यामुळे घरातच असूनही अनेकांच्या वॉल आणि स्टोरीज ट्रॅव्हल फोटोंनी भरून गेल्या आहेत.

‘जगातल्या बहुतांश देशात करोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे प्रत्यक्ष फिरण्याचा विचार करता येत नसला, अशा विविध देशांच्या ट्रिपचे फोटो नेटकरी शेअर करत आहेत. यातून पुन्हा सगळं काही सुरळीत होईल असा सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न आहे’, असं सुजाता राऊतनं सांगितलं. नुसतेच फोटो पोस्ट न करता काही जण त्यांच्या त्या-त्या पर्यटनस्थळाविषयीच्या आठवणी, किस्से याविषयी लिहित आहे. लेखक आदित्य दवणे यानंही त्यानं यापूर्वी केलेल्या कर्नाटकातील हम्पीच्या सोलो ट्रिपविषयी नवीन लेखांची मालिका सुरू केली आहे.

व्हर्च्युअल टूर्सचे पर्याय

गुगल आर्ट आणि कल्चर यासारख्या काही वेबसाइटवरून व्हर्च्युअल टूर्सचे विविध पर्याय खुले करण्यात आले आहेत. सध्या पर्यटकांची आकर्षणं असलेली अनेक ठिकाणं बंद असली, तरी या व्हर्च्युअल टूरमधून तुम्ही त्या स्थळांना भेटी देऊ शकणार आहात. यामध्ये डिस्ने लँड, ऑपेरा हाऊस, ताजमहाल तसंच अनेक म्युझियम्सच्या वेबसाईट, नासासारख्या संस्था यांचा समावेश आहे. भाडिपा आणि भा2पा यांनीही या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ‘अराउंड द वर्ल्ड’ अशा हॅशटॅगसह काही खास गोष्टी पोस्ट करणार आहेत. काही पर्यटनस्थळांविषयी माहितीही देणार आहेत.

घरच्या घरी फिरती
पुढचे काही दिवस फक्त घरातच थांबायचं असल्यानं यावरून मिम्स बनायला सुरुवात झाली आहे. ‘हे घरची माझे विश्व’ असं म्हणत घरातील विविध खोल्यांना पर्यटनस्थळांची, किल्यांची किंवा शहरांतील विविध भागांची नावं देत एक खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना गिरगाव चौपाटीवरून गेटवेला जातोय असं किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जातोय असे विविध संवाद सोशल मीडियावर रंगले आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here