गेल्या काही महिन्यात स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यात फोन वापरणाऱ्या यूजर्सला दुखापत देखील झाली आहे. ब्लास्ट झालेल्या डिव्हाइसमध्ये प्रामुख्याने OnePlus Nord 2 या स्मार्टफोनचा समावेश आहे. या व्यतिरिक्त देखील अनेक फोन्सचा ब्लास्ट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तुमच्या फोनचा देखील स्फोट होऊ नये यासाठी काय करायला हवे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याआधी प्रश्न असा निर्माण होतो की, फोनचा स्फोट नक्की कोणत्या कारणामुळे होतो. काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी ए२१ स्मार्टफोनमध्ये आग लागल्याने अलास्क एअरलाइन्सने प्रवाशांना विमानातून खाली उतरवले होते. त्यामुळे फोनचा स्फोट का होतो व अशी दुर्घटना घडू नये म्हणून काय करायला हवे, माहिती असणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहिल.

​स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे कारण

वर्ष २०२१ मध्ये OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या जवळपास ४ घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये यूजर्सला दुखापत देखील झाली आहे. अनेकदा फोनमधील त्रुटीमुळे अशा घटना घडल्याचे दिसून येते. मात्र, कंपनीकडून जाहीरपणे याचा स्विकार केला जात नाही. मॅन्यूफॅक्चरिंग डिफेक्ट, प्रोसेसर ओव्हरलोडिंग आणि थर्ड पार्टी चार्जरचा उपयोग केल्याने फोनमध्ये आग लागल्याच्या घटना घडतात. बहुतांश घटनांमध्ये बॅटरी खराब झाल्याने अशी घटना घडल्याचे देखील समोर आले आहे.

​अधिक गरम व जास्त चार्ज झाल्याने बॅटरीचा स्फोट

अनेकदा आपण तासंतास स्मार्टफोन चार्जिंगला लावून ठेवतो. काहीजणांना रात्री झोपताना फोन चार्जिंग लावून ठेवण्याची देखील सवय असते. मात्र, यामुळे फोनच्या बॅटरीवर परिणाम होत असतो. फोन व अन्य डिव्हाइसमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीच्या सेल्समध्ये तापमान क्रिटिकल असते. ओव्हरचार्जिंग व इतर कारणांमुळे फोन गरम झाल्यास हे तापमान मर्यादेपेक्षा पुढे जाते. अनेकदा फोन जास्त वेळ वापरल्याने, उन्हात असल्याने देखील गरम होतो. त्यामुळे फोनचा स्फोट होण्याच्यी शक्यता असते.

​बॅटरी खराब झाल्यास

स्मार्टफोनचा स्फोट होण्याआधी त्याच्याशी संबंधित काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जसे की, स्मार्टफोनमधून जळणाऱ्या प्लास्टिकचा वास, पॉपिंगचा आवाज किंवा फोन गरम झाला असल्यास अथवा बॅटरी फुगल्यास, अशावेळी फोनला त्वरित बंद करून लांब ठेवा. तसेच, चार्जिंगवरून देखील फोन काढावा. फोनला जळणाऱ्या वस्तूंपासून लांब ठेवावे. ज्यामुळे फोनचा स्फोट झाला तरीही तुम्हाला दुखापत होणार नाही. याशिवाय फोन थंड झाल्यानंतर तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासू शकता.

​फोनचा स्फोट होऊ नये म्हणून करा हे उपाय

स्मार्टफोन वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण स्मार्टफोन खिशात असताना किंवा वापरत असताना अचानक स्फोट झाल्यास दुखापत होऊ शकते. स्मार्टफोन वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जसे की –

  • डिव्हाइसला खाली पडू देऊ नका.
  • अधिक तापमान आणि थेट उन्हाचा प्रकाश पडेल, अशा ठिकाणांपासून लांब ठेवा.
  • अधिक चार्ज करणे टाळा.
  • डिव्हाइसच्या बॅटरीला काहीही करू नका. तसेच, बनावट बॅटरी वापरणे टाळा.
  • तसेच, कंपनीसोबतच येणारा चार्जर वापरा. इतर चार्जर वापरल्यास फोन खराब होऊ शकतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here